‘आयटीआय’ला झाले १४८८ प्रवेश; सर्वाधिक पसंती इलेक्ट्रीशियनला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 05:00 AM2020-12-12T05:00:00+5:302020-12-12T05:00:07+5:30
जिल्ह्यात एकंदर १८ औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आहेत. तेथे एकंदर ४ हजार २०० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. तेथे इलेक्ट्रीशियन, वायरमन, फिटर, मोटर मेकॅनिक, कम्प्युटर ऑपरेटर कम असिस्टंट, सुतारकाम, मशिनिस्ट, टर्नर, सर्व्हेअर, वेल्डर, तसेच मुलींसाठी ड्रेस मेकिंग, बेसिक काॅस्मोटोलाॅजी आदी ट्रेड्स उपलब्ध आहेत. दरवर्षी सर्वच ट्रेड्सला विद्यार्थी प्रवेश घेत असले तरी इलेक्ट्रीशियन, वायरमन या ट्रेडला सर्वाधिक पसंती मिळते.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोनामुळे शाळा-महाविद्यालयांचे प्रत्यक्ष वर्ग सुरू होण्याला विलंब झाला, तसाच प्रकार आयटीआय बाबतही घडलेला असला तरी आता आयटीआयची प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून आतापर्यंत जिल्ह्यात १४८८ विद्यार्थ्यांनी प्रवेशही घेतला आहे.
जिल्ह्यात एकंदर १८ औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आहेत. तेथे एकंदर ४ हजार २०० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. तेथे इलेक्ट्रीशियन, वायरमन, फिटर, मोटर मेकॅनिक, कम्प्युटर ऑपरेटर कम असिस्टंट, सुतारकाम, मशिनिस्ट, टर्नर, सर्व्हेअर, वेल्डर, तसेच मुलींसाठी ड्रेस मेकिंग, बेसिक काॅस्मोटोलाॅजी आदी ट्रेड्स उपलब्ध आहेत. दरवर्षी सर्वच ट्रेड्सला विद्यार्थी प्रवेश घेत असले तरी इलेक्ट्रीशियन, वायरमन या ट्रेडला सर्वाधिक पसंती मिळते. तोच प्रकार यंदाही दिसत आहे.
यंदा आतापर्यंत प्रवेशाच्या दोन फेऱ्या पार पडल्या. त्यात पहिल्या फेरीत ९८५ तर दुसऱ्या फेरीत १४८८ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. ३५ टक्के प्रवेश आतापर्यंत आटोपले असून उर्वरित प्रवेशांकरिता आता सोमवारी तिसरी फेरीही राबविली जाणार आहे. विशेष म्हणजे, यंदा दुसऱ्या वर्षात असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष वर्गही १५ ऑक्टोबरपासून सुरू झाले आहे.
१८ ‘आयटीआय’मध्ये जिल्ह्यात प्रवेश प्रक्रिया
जिल्ह्यातील १८ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये आतापर्यंत १४८८ विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तिसरी फेरी सोमवारी राबविली जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना मोबाइलवर सतत मेसेज पाठवून प्रवेश प्रक्रियेबाबत अद्ययावत माहिती दिली जात आहे. परंतु, अनेक विद्यार्थ्यांचे मोबाइल क्रमांक बदलल्याची किंवा काहींनी इतर अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्याची बाब पुढे येत आहे.
इलेक्ट्रीशियन, ड्रेस मेकिंगकडे कल
जिल्ह्यातील आयटीआयमध्ये विद्यार्थ्यांसाठी अनेक ट्रेड उपलब्ध असले तरी सध्या वीज वितरणमध्ये जागा उपलब्ध असल्याची चर्चा पसरल्याने इलेक्ट्रीशियन वायरमन या ट्रेडकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. तर विद्यार्थिनींकडून ड्रेस मेकिंग ट्रेडला प्रवेश घेतले जात आहे.