यवतमाळ परिसरात १५ कोटींच्या रेतीचे साठे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 05:00 AM2020-06-11T05:00:00+5:302020-06-11T05:00:17+5:30
रेतीच्या तस्करीतून मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याने यात अनेकांचे हात गुंतले आहेत. थेट सत्तेपर्र्यंत वाटे जात असल्याने कोणतीच ठोस कारवाई होताना दिसत नाही. अनेक रेती तस्कारांनी परंपरागत वाहने बदलवून आता ट्रान्सपोर्टवर चालणारे बारा, चौदा, सोळा चाकाच्या ट्रकचा वापर सुरू केला आहे. नदी घाटावर रेती उत्खनन केल्यानंतर रस्त्यावरच्या एखादा शेतात तिचा साठा केला जातो.
सुरेंद्र राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पावसाळ्यात रेती घाटांचा लिलाव होणार आहे. परंतु माफियांनी त्यापूर्वीच घाट उपसून मोकळे केले आहे. यवतमाळ परिसरात सुमारे १५ कोटी रुपये किमतीच्या रेतींचे साठे करण्यात आले आहे. रेती माफियांनी तस्करीसाठी चक्क अत्यावश्यक सेवा पासचा वापर केला असून त्यासाठी मालवाहू वाहने वापरली जात आहेत. हे रेती साठे व तस्करी प्रशासन-खनिकर्म विभागासाठी आव्हान आहे. या रेती तस्करांना राजकीय अभय असल्याचेही बोलले जाते.
रेतीच्या तस्करीतून मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याने यात अनेकांचे हात गुंतले आहेत. थेट सत्तेपर्र्यंत वाटे जात असल्याने कोणतीच ठोस कारवाई होताना दिसत नाही. अनेक रेती तस्कारांनी परंपरागत वाहने बदलवून आता ट्रान्सपोर्टवर चालणारे बारा, चौदा, सोळा चाकाच्या ट्रकचा वापर सुरू केला आहे. नदी घाटावर रेती उत्खनन केल्यानंतर रस्त्यावरच्या एखादा शेतात तिचा साठा केला जातो. त्यानंतर ही रेती या ट्रकमध्ये भरून ते ट्रक ताडपत्रीने झाकण्यात येतो. यामुळे जीवनावश्यक वस्तूचीच वाहतूक होत आहे, असे भासविले जाते. अनेकांनी तर चक्क अशा ट्रकवर त्याच्या अधिकृत पासेसही लावल्या आहेत. शिवाय शहरात येणाऱ्या प्रत्येक पोलीस चौकी, तपासणी नाक्याचा महिन्याकाठी हिशोब होत असल्याने रेतीच्या ट्रकला कोणीच थांबवित नाही.
या पास लावलेल्या ट्रकमधून चोरीची रेती थेट शहरातील विविध भागात साठविली जात आहे. मागील १५ दिवसांत किमान ५० हजार ब्रास रेतीचा साठा माफियांनी केला आहे. शासन पाऊस संपल्यानंतर घाटांचा लिलाव करणार आहे. त्यापूर्वीच माफीयांनी रेती घाट रिकामे केले आहेत. यातून शासनाचा कोट्यावधीचा महसूल बुडाला आहे. आज शासन आर्थिक तंगीत असताना त्याच्या हक्काच्या महसुलावर पाणी सोडले जात आहे. आता हा साठा ताब्यात घेऊन त्याचा लिलाव केल्यास महसुलाची भरपाई करण्याचे औदार्य दाखविण्यात येते का याकडे लक्ष लागले आहे.
विभागीय आयुक्तांच्या निर्देशाची पायमल्ली
महाराष्ट्र शासनाने परिपत्रक काढून रेती माफियांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. याच निर्देशानुसार कारवाई करण्याचे आदेश विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. प्रत्यक्ष मात्र आतापर्यंत एकाही रेती माफियावर फौजदारी कारवाई करण्यात आली नाही. रेती माफीयांच्या मुसक्या आवळण्यासाठी मकोकाअंतर्गत तडीपारीची कारवाई करण्याचे आदेश आहेत. मात्र दुर्दैवाने कोणावरच कारवई न झाल्याने एक प्रकारे वरिष्ठांच्या आदेशाची पायमल्ली केली जात आहे.
येथे आहे अवैध रेती साठा
भोसा मार्गावरील गुलमोहर पार्कमध्ये एक हजार ५०० ब्रास रेतीचा साठा केला आहे. रेतीघाटावरून रात्री १२ चाकी व १४ चाकी ट्रकमधून रेती आणली जात आहे. गोधनी येथील गिट्टीखदान, भोसा येथील भारतनगर, शादाब बाग, कोहिनूर सोसायटी, प्रभातनगर, सारस्वत ले-आऊट, जिद्राननगर पांढरकवडा रोड, घाटंजी रोड, बायपास रिंग रोड, नागपूर रोडवर पोबारू ले-आऊट, डेहनकर ले-आऊट, याशिवाय धानोरा कोट्यावधी रुपयांच्या रेतीचा अवैध साठा केला आहे.