१५ कोटींच्या सुगंधित तंबाखू साठ्याची अखेर चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 05:00 AM2020-04-23T05:00:00+5:302020-04-23T05:00:49+5:30
नियंत्रण कक्षातील सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्याकडे चौकशीची ही जबाबदारी सोपविली गेली आहे. चौकशी अधिकाऱ्याने पांढरकवडा व भोसारोडवरील सर्व प्रमुख गोदामांवर लक्ष केंद्रीत केले आहे. डेहणकर ले-आऊट परिसर, फुकटनगरातील प्रमुख व्यक्ती व त्याला पाठबळ देणाºया छोटी गुजरीतील व्यावसायिकावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नामांकित ब्रॅन्डच्या सुगंधित तंबाखूचा १५ कोटींचा साठा गोदामात लॉकडाऊनमुळे अडकून पडल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी दिले आहेत.
नियंत्रण कक्षातील सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्याकडे चौकशीची ही जबाबदारी सोपविली गेली आहे. चौकशी अधिकाऱ्याने पांढरकवडा व भोसारोडवरील सर्व प्रमुख गोदामांवर लक्ष केंद्रीत केले आहे. डेहणकर ले-आऊट परिसर, फुकटनगरातील प्रमुख व्यक्ती व त्याला पाठबळ देणाºया छोटी गुजरीतील व्यावसायिकावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. कोट्यवधींचा सुगंधित तंबाखूचा साठा होऊनही अन्न व औषधी प्रशासन अनभिज्ञ कसे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या मागेही ‘रहस्य’ असल्याचे बोलले जाते.
नामांकित ब्रॅन्डचा सुगंधित तंबाखू येथून जिल्हाभर विकला जातो. त्याचे पांढरकवडा रोड, भोसा रोड परिसरात गोदाम असून तेथे १५ कोटींच्या मालाचा साठा असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत पोलीस अधीक्षकांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडल्याने भोसा परिसर सील करण्यात आला आहे. शारदा चौकापासून पुढे पोलिसांची प्रचंड वर्दळ आहे. त्यामुळे भोसा रोड, पांढरकवडा रोडवरील गोदामात १५ कोटींचा माल अडकून आहे. हा माल काढणे रिस्की आहे. तरीही दुप्पट दराने या मालाची विक्री होते आहे. पुसद, उमरखेडपर्यंत हा सुगंधित तंबाखू पाठविला जातो.
तेलंगाणा सीमेवर साठा
प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा महाराष्ट्र-तेलंगाणा सीमेवरील आदिलाबाद जिल्ह्यात येणाºया एका गावात गोदामांमध्ये केला जातो. तेथूनच पुढे हा माल जिल्हा मुख्यालयी व तेथून तालुक्यापर्यंत तसेच मोठ्या गावांपर्यंत पाठविला जातो.
बनावट तंबाखू निर्र्मात्यांची धावाधाव
यवतमाळच्या एमआयडीसीत नामांकित ब्रॅन्डच्या नावाने बनावट सुगंधी तंबाखू बनविण्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. त्यानंतर या कारखान्याच्या सूत्रधारांची बरीच धावाधाव झाली. तीन लोकांचे वेगवेगळे कारखाने आहे. ते तिघेही राजकीय कार्यकर्ते आहेत. धाड पडण्याच्या भीतीने त्यांनी तूर्त सुगंधित तंबाखूची निर्मिती थांबविल्याचे सांगितले जाते. या बनावट सुगंधी तंबाखू कारखान्याचे तार पाटीपुरा परिसरातील एका व्यक्तीशी जुळलेले असल्याची माहिती आहे.