१५ दिवस जिल्ह्यात आधार नोंदणी ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 01:03 AM2017-07-24T01:03:00+5:302017-07-24T01:03:00+5:30
जिल्ह्यात एकीकडे आधार नोंदणीचे काम झपाट्याने पूर्णत्वाकडे जात असताना आता कंपनी,
परिचालकांवर गदा : प्रशासन म्हणते, पैसे द्या किंवा मशीन वापरू नका
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात एकीकडे आधार नोंदणीचे काम झपाट्याने पूर्णत्वाकडे जात असताना आता कंपनी, प्रशासन आणि सेतू केंद्र परिचालक यांच्यातील खेचाखेचीत आधार नोंदणीच बंद पडलेली आहे. गेल्या आठ दिवसांपासून गावपातळीवरील सेतू केंद्रावर आधार नोंदणी थांबली असून पुढील १५ दिवस तरी हे काम सुरूळीत सुरू होण्याची चिन्हे नाहीत.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकंदर १५४ परिचालकांकडून सेतू केंद्र चालविले जाते. त्यांच्या माध्यमातून गावकऱ्यांना गावातच आधार नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, आधार नोंदणीचे जिल्ह्याचे कामही तब्बल ९८ टक्के पूर्ण झाले आहे. जेमतेम २ टक्के नागरिकांची नोंदणी शिल्लक असताना वाद उद्भवला आहे.
ज्या सीएससी, सीएमएस कंपनीकडून आधारचे काम जिल्हा प्रशासन करवून घेत आहे, त्या कंपन्यांकडून परिचालकांचे मानधन अडविण्यात आले आहे. त्यावरही मात करीत परिचालकांनी आधार नोंदणीच्या कामात खंड पडू दिलेला नव्हता. मात्र, आता प्रशासन या कंपन्यांकडून आधार नोंदणीचे काम काढून महाआॅनलाईनकडे सोपवित आहे. या प्रक्रियेत कंपनीने आणि प्रशासनानेही परिचालकांना मात्र वेठीस धरले आहे. एकतर मशीनच्या रकमेपोटी बँक गॅरंटी म्हणून ५० हजार रुपये जमा करा किंवा आधारची मशीन वापरू नका, असे या परिचालकांना बजावण्यात आले आहे.
परंतु, इमाने इतबारे ९८ टक्के काम पूर्ण केलेले असताना केवळ २ टक्के कामासाठी चक्क ५० हजार रूपये कुठून जमा करायचे, असा प्रश्न गावखेड्यातील सेतू केंद्र परिचालकांना पडला आहे. त्यामुळे सर्व १५४ परिचालकांनी मशीनही वापरायची नाही आणि पैसेही जमा करायचे नाही, अशी ताठर भूमिका घेतली आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून आधार नोंदणीचे कामच थांबले आहे. तर पुढील १५ दिवसांपर्यंत काम सुरूळीत होणे शक्यच नसल्याचे जिल्हा प्रशासनातील सूत्राने सांगितले.
जिल्हास्तरावर समन्वय नाही
जिल्ह्यातील आधार नोंदणीच्या कामाचा समन्वय साधण्यासाठी सध्या जिल्हा स्तरावर अधिकाऱ्याची वाणवा निर्माण झाली आहे. त्यामुळे खेड्यापाड्यात बंद झालेल्या आधार नोंदणीबाबत सध्या कुठेही हाकबोंब होताना दिसत नाही. जिल्हाधिकारी कार्यालयातून काम पाहणारे जिल्हा समन्वयक उमेश घुग्गुसकर यांची नुकतीच नागपूर येथे बदली झाली. त्यानंतर समन्वयाची जबाबदारी कुणालाही सोपविण्यात आली नाही. त्यामुळे जिल्हास्तरावर आधारच्या कामाबाबत समन्वयाचा अभाव दिसून येत आहे.
तांत्रिक अडचणीमुळे जिल्हा मुख्यालयातील आधार केंद्रही बंद आहे. गावपातळीवरील सेतू केंद्रांना कंपनीच्या आणि राज्य शासनाच्या सूचनेनुसार अनामत रक्कम जमा करण्याच्या सूचना असू शकतात.
- सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हाधिकारी, यवतमाळ