राळेगावात १५ दिवसाआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 09:21 PM2019-04-01T21:21:30+5:302019-04-01T21:21:50+5:30

तब्बल आठ कोटी रुपयांची वाढीव पाणी पुरवठा योजना गतवर्षी पूर्णत्वास गेलेली असताना राळेगावकरांना आत्ताच १५ दिवसांआड पाणी मिळत आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा पेटण्याचे संकेत असून पाण्याअभावी एप्रिल व मे महिन्यात नागरिकांवर शहर सोडण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

15 days water in Ralegaon | राळेगावात १५ दिवसाआड पाणी

राळेगावात १५ दिवसाआड पाणी

Next
ठळक मुद्देउन्हाळा पेटणार : एप्रिल, मेमध्ये शहर सोडण्याची वेळ, कायमस्वरूपी उपाययोजना दुर्लक्षित

के.एस. वर्मा ।
लोकमत न्यूज नेटवर्क
राळेगाव : तब्बल आठ कोटी रुपयांची वाढीव पाणी पुरवठा योजना गतवर्षी पूर्णत्वास गेलेली असताना राळेगावकरांना आत्ताच १५ दिवसांआड पाणी मिळत आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा पेटण्याचे संकेत असून पाण्याअभावी एप्रिल व मे महिन्यात नागरिकांवर शहर सोडण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
सात वर्षांपूर्वी ७५ लाख रुपयांचे फिल्टर प्लांट बांधून उपयोगात आले होते. दीड वर्षांपूर्वी जलशुद्धीकरण केंद्राचे नूतनीकरण झाले. कळमनेर येथील डोहात (वर्धा नदी पात्र) पाणीही उपलब्ध आहे. लोडशेडींगचा त्रास टाळण्यासाठी सतत वीज पुरवठा सुरु राहण्याकरिता स्वतंत्र फिडर बसविण्यात आले आहे. तरीही राळेगावला आठ-दहा दिवसांआड पाणी पुरवठा होत आहे. गत सप्ताहात होळी, धुुळवडीच्या तोंडावर तर १५ दिवसानंतर नळ सोडण्यात आले होते. मार्चमध्येच ही स्थिती आहे, तर एप्रिल आणि मे महिन्यात काय होणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
वर्धा नदीचे पात्र आटले आहे. गत अनेक वर्षांपासून ही नदी सहा महिने कोरडी राहाते. गत वर्षी केवळ ६० टक्के पाऊस झाल्याने व शहराजवळचे तलाव कोरडे पडल्याने भूजल पातळी दोन मीटरने खाली गेली आहे. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात शहरवासीयांना पाण्यासाठी स्थलांतर करावे लागण्याची भीती निर्माण झाली आहे.
नगरपंचायत पदाधिकारी व प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे ही स्थिती उद्भवली आहे. नळ कोणत्या दिवशी व वेळी येणार, याबाबात कोणतेच धोरण नाही. नळाचे दिवस निश्चित नाही. सुविधेनुसार नळ सोडले जातात. यामुळे नागरिकांना बाहेरगावी वा कामावर जाता येत नाही. उन्हाळा असूनही पाणीटंचाईमुळे कूलर लावता येत नाही. बाहेरगावावरून आलेल्या पाहुण्यांना थांबविता येत नाही. श्रीमंत, मध्यम वर्ग टँकर आणून गरज निभावून घेतात. मात्र गोरगरीब टँकर आणू शकत नाही. जादा पाणीही साठवू शकत नाही. त्यामुळे हंडाभार पाण्यासाठी त्यांची भटकंती सुरुच आहे.
नगरपंचायत वीज बिलाच्या २१ लाख रुपयांचा भरणा करू शकली नाही. त्यामुळे पथदिव्यांचा वीज पुरवठा तोडला गेला. आता पाणी पुरवठ्याची वीज कापण्याची शक्यता बळावली आहे. अशी राळेगावची गंभीर स्थिती आहे. येथे पाच असंतुष्ट भाजपा, चार काँग्रेस व एक शिवसेना नगरसेवकांचा गट सत्तेत आहे. सर्व पदाधिकारी महिला आहे. तरीही पाणीटंचाईची समस्या सुटत नाही. त्यात दिल्ली, मुंबईच्या प्रतिनिधींच्या दुर्लक्षणाने अडचणी वाढल्या आहे. एक वर्षापासून सार्वजनिक नळ, स्टँड पोस्ट बंद केल्यानेही अडचणीत भर पडली आहे. कायमस्वरूपी उपाययोजना कराव्या, अशी शहरातील नागरिकांची एकमुखी मागणी आहे.
यवतमाळला ‘अमृत’, अन्य तीन तालुक्यांना कधी?
४यवतमाळ शहराला ३०० कोटी रुपये खर्च करून ‘अमृत’ योजनेंतर्गत बेंबळा धरणातून पाणी पुरवठा केला जाणार आहे. त्याचवेळी दरवर्षी राळेगाव व कळंबला पाणीटंचाई भेडसावत आहे. राळेगावात नव्या वस्तीत १०-१५ दिवसांआड केवळ तासभर पाणी पुरवठा होतो. बाभूळगाव येथे तूर्तास पाणीटंचाई जाणवत नसली, तरी भविष्यातील तरतूद म्हणून या दोन्ही शहरांना अमृत प्रमाणेच बेंबळा धरणातून पाणी पुरवठा करण्याची गरज आहे. यवतमाळसह तिन्ही ठिकाणी सतत शुद्ध पाणी पुरवठा व्हावा, या दृष्टीनेही पावले उचलण्याची गरज आहे. गत लोकसभा निवडणुकीच्या वेळी भावना गवळी यांनी या तिन्ही शहरात पाणी पुरवठा सुविधा करण्याचे अश्वासन दिले होते. मात्र आता त्यांना त्या आश्वासनाचे विस्मरण झाल्याचे दिसत आहे.

Web Title: 15 days water in Ralegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.