‘आयुष्यमान’चा १५ लाख लोकांना लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 09:21 PM2018-09-24T21:21:40+5:302018-09-24T21:22:08+5:30
सामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ‘आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य’ ही अत्यंत महत्वाची योजना आहे. जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील एकूण तीन लाख ८६ हजार५४४ कुटुंब पात्र ठरले आहेत. या कुटुंबातील जवळपास १५ लाख नागरिकांना ‘आयुष्यमान भारत’ या योजनेचा लाभ घेता येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ‘आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य’ ही अत्यंत महत्वाची योजना आहे. जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील एकूण तीन लाख ८६ हजार५४४ कुटुंब पात्र ठरले आहेत. या कुटुंबातील जवळपास १५ लाख नागरिकांना ‘आयुष्यमान भारत’ या योजनेचा लाभ घेता येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
नियोजन भवन येथे ‘आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा’ शुभारंभ करताना ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. अशोक उईके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, अतिरिक्त जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मनिष श्रीगिरीवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी काही लोकांना मान्यवरांच्या हस्ते ‘आयुष्यमान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे’ ई-कार्ड देण्यात आले. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रांची (झारखंड) येथील या योजनेच्या राष्ट्रीय शुभारंभाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले. यावेळी सदर योजनेविषयीची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
प्रास्ताविक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी केले. संचालन प्रशांत पाटील यांनी तर आभार निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज तगडपल्लीवार यांनी मानले. कार्यक्रमाला नगरपरिषद आरोग्य सभापती दिनेश चिंडाले, रेखा कोठेकर, आयुष्यमान भारत योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. मुकेश मारू, दर्शन चांडक, डॉ. टी.सी. राठोड आदी उपस्थित होते.