अत्याचाराच्या गुन्ह्यात वृद्धाला १५ वर्षांची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 10:11 PM2019-07-22T22:11:16+5:302019-07-22T22:11:55+5:30
घराशेजारी असलेल्या अल्पवयीन मुलीला घरात खेळण्यास बोलावून तिच्यासोबत लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला जिल्हा सत्र न्यायालयाने १५ वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली. सोमवारी हा निकाल आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : घराशेजारी असलेल्या अल्पवयीन मुलीला घरात खेळण्यास बोलावून तिच्यासोबत लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला जिल्हा सत्र न्यायालयाने १५ वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली. सोमवारी हा निकाल आला.
प्रमोद हरिभाऊ झोड (६४) रा. शिंगणापूर ता. कळंब असे शिक्षा झालेल्या वृद्धाचे नाव आहे. त्याने २९ जानेवारी २०१५ रोजी घराजवळ असलेल्या अल्पवयीन मुलीला खेळायला बोलाविले. तिला खाऊ देऊन दुचाकीवर फिरविण्याचे आमिष दिले. नंतर घरातील गोठ्यात नेऊन तिच्यासोबत लैंगिक चाळे केले.
दरम्यान दुपारचे ४ वाजले तरी मुलगी घरी आली नाही म्हणून तिची आई तिला शोधत होती. मुलीच्या शोधात ती आरोपीच्या गोठ्याजवळ पोहोचली. तिथे मुलगी कापड घालताना दिसली. तीने मुलीला नेमका काय प्रकार आहे याबाबत विचारणा केली. तोपर्यंत आरोपी प्रमोद झोड हा तेथून निघून गेला होता. पीडित मुलीच्या आईने हा प्रकार मुलीच्या वडिलांना सांगितला. त्यानंतर ३१ जानेवारी रोजी पीडितच्या आईने कळंब पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वैद्यकीय तपासणी करून या गुन्ह्यात भादंवि ३७६ (२) (८) पोस्को कलम ६ नुसार गुन्हा दाखल केला. उपविभागीय अधिकारी राहुल मदने यांनी या गुन्ह्याचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश टी.एस. अकाली यांनी एकूण सात साक्षीदार तपासले. यामध्ये पीडित व तिची आई, वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली. आरोपीला १५ वर्षे सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाच्या रकमेपैकी २० हजार रुपये पीडित मुलीला देण्याचा आदेश केला. जिल्हा सरकारी वकील नीती दवे यांनी बाजू मांडली.
शिरपूरच्या बोगस डॉक्टरला कारावास
वणी : तालुक्यातील चारगाव चौकी येथे कुठलीही पात्रता नसताना वैद्यकीय व्यवसाय करणाºया डॉक्टरला वणी न्यायालयाने दोन वर्ष कारावास व दंडाची शिक्षा ठोठावली. चारगाव चौकी येथील उत्तम सुबोध विश्वास हा वैद्यकीय व्यवसाय करीत होता. याची तक्रार प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत देविदास चांदेकर यांनी शिरपूर पोलीस ठाण्यात केली. या प्रकरणी मेडिकल प्रॅक्टीशनर अॅक्ट कलम ३३ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला. शिरपूर ठाण्यातील सहायक फौजदार प्रकाश तायडे यांनी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. प्रथम श्रेणी न्यायाधीश आर.आर. खामटकर यांनी आरोपीला दोन वर्ष कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास एक महिना कारावासाची शिक्षा दिली. या खटल्यात सहायक सरकारी अभियोक्ता तुघनायक यांनी बाजू मांडली. त्यांना कोर्ट पैरवी प्रकाश कुमरे यांनी सहकार्य केले.