१५० क्विंटल साखर परत पाठविली
By admin | Published: September 1, 2016 02:30 AM2016-09-01T02:30:47+5:302016-09-01T02:30:47+5:30
बाभूळगाव तालुक्याला वितरणासाठी पुरविलेली साखर निकृष्ट दर्जाची आणि अतिशय बारीक असल्याचे लक्षात
बाभूळगाव तहसील : सहा दुकानदारांना बजावली नोटीस
यवतमाळ : बाभूळगाव तालुक्याला वितरणासाठी पुरविलेली साखर निकृष्ट दर्जाची आणि अतिशय बारीक असल्याचे लक्षात येताच तहसीलदार दिलीप झाडे यांनी तब्बल १५० क्विंटल साखर परत केली.
बाभूळगाव तालुक्याला सणासुदीच्या काळात १५० क्विंटल साखर वितरणासाठी पाठविली होती. परंतु ही साखर अतिशय बारीक असल्याचे लक्षात आले. त्यामुळे दुकानदार ही साखर स्वीकारणार नसल्याचे लक्षात आल्याने तहसीलदारांनी ही साखर परत पाठविली. नवीन साखर बाभूळगाव तालुक्यासाठी वळती करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील स्वस्तधान्य दुकानांच्या मनमानी कारभाराविरूद्ध जिल्हा प्रशासनाने आता सणासुदीच्या दिवसांत कठोर पाऊल उचलले आहे. दुनाकदारांच्या मनमानीला आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्यास पुरवठा विभागाने सुरूवात केली. त्यानुसार जिल्ह्यातील काही दुकानांवर अचानक धाडी घालण्यात आल्या. या धाडीत काही स्वस्तधान्य दुकान आणि केरोसिन विक्री दुकानांच्या विक्रीत गंभीर बाबी आढळल्या. दुकानावर नावाचे फलक नसणे, दर पत्रक नसणे, साठा फलक नसणे, ही बाब बहुतांश ठिकाणी उघड झाली.
काही दुकानदारांना त्वरित योग्य त्या दुरूस्त्या करण्याची तंबी दिले. मात्र गंभीर प्रकार आढळलेल्या सहा विक्रेत्यांना जिल्हा पुरवठा अधिकारी शालीग्राम भराडी यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यात महागाव तालुक्यातील दोन, केळापूर व झरीतील प्रत्येकी एक, तर आर्णी तालुक्यातील दोन विक्रेत्यांचा समावेश आहे. दुसरीकडे पुरवठा विभागाकडून पुरविण्यात आलेल्या साहित्यातही घोळ असल्याचे सिद्ध होत आहे.
(शहर वार्ताहर)