कृषिपंप वीज जोडणीसाठी १५२ कोटी
By admin | Published: May 7, 2017 12:54 AM2017-05-07T00:54:21+5:302017-05-07T00:54:21+5:30
यवतमाळ जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाभूळगाव येथे सखोल आढावा घेतला.
मुख्यमंत्र्यांची घोषणा : बाभूळगावात आढावा बैठक, सिंचन, दुग्धव्यवसाय, गटशेतीबाबत निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क
बाभूळगाव : यवतमाळ जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाभूळगाव येथे सखोल आढावा घेतला. यात जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, स्वच्छ भारत अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, पीककर्ज पुरवठा, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना यांचा आढावा घेत कृषी पंप वीज जोडणीसाठी १५२ कोटी रूपये उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा या बैठकीत केली.
बैठकीच्या सुरवातीलाच मुख्यमंत्र्यांनी खरीप हंगामाची बि-बियाणे वाटप आणि पीककर्जाच्या नियोजनाची माहिती घेतली. शेतकऱ्यांना ९० टक्के खरिपाचे कर्ज उपलब्ध करून देण्यास सांगितले. त्यासाठी बँकांनी कर्ज मेळावे घ्यावे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. जलयुक्त शिवारच्या कामांमुळे जिल्ह्याच्या उत्पन्नात ४५० कोटींची भर पडल्याचे बैठकीत सांगण्यात आले. त्यामुळे जलयुक्त शिवारची संपूर्ण कामे १५ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे यंत्रणेला सांगितले. जिल्ह्यात कृषी पंप वीज जोडणीचे ५ हजार ४३० प्रस्ताव प्रलंबित आहे. ही प्रलंबित प्रकरणे तत्काळ पूर्ण करून १५ दिवसांच्या आत मागेल त्याला वीज जोडणी देण्यासाठी १५२ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतीला जोडधंदा म्हणून दुध व पशुपालन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या प्रकल्पामध्ये यवतमाळ जिल्ह्याचा समावेश करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. गटशेतीला प्रोत्साहन देण्यासाठी २० शेतकऱ्यांचा १०० एकर जमीन असलेला गट तयार केल्यास ५० लाख रुपयांपर्यंतच्या सर्व योजना एकत्रित राबविण्यात येईल. याबाबत सिंचन क्षमता वाढविण्याचे धोरण शासन राबवित असल्याचे त्यांनी सांगितले. पाणी वाटपाचे नियोजन होणार असून जिल्ह्यातील सिंचनासंदर्भात प्रलंबित असलेल्या सर्व प्रस्तावांना ७ दिवसात शासन मंजुरी देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. रखडलेल्या प्रकल्पाचे काम ‘मिशन मोड’मध्ये करण्याच्या सूचना दिल्या. ग्रामीण व शहरी भागात राबविल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री घरकुल योजनेचीही माहिती त्यांनी घेतली.
या शिवाय बैठकीत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा तालुुकानिहाय आढावा घेण्यात आला. ज्या तालुक्यात कामाची गती कमी आहे, अशा महसूल, कृषी व गटविकास अधिकाऱ्यांकडून कामांच्या पद्धतीसंदर्भात माहिती घेत त्यांना काम पूर्ण करण्याची तंबी दिली.
या बैठकीला पालकमंत्री मदन येरावार, खासदार भावना गवळी, आमदार राजू तोडसाम, आमदार राजेंद्र नजरधने, आमदार संजीवरेड्डी बोदकुलवार, आमदार डॉ. अशोक उईके, जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे, अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी, विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला उपस्थित होते. तसेच या दौऱ्यासंदर्भात भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, बाभूळगावातील स्थानिक नेते अमन गावंडे, प्रभाकर वाघमारे, गुणवंत ठाकरे, सचिन महल्ले, जिल्हा परिषदेच्या सभापती प्रज्ञा भूमकाळे, प्रकाश भूमकाळे, मनोहर बुरेवार, कोमल खंते, गौतम लांडगे, पवन मानलवार, विवेक परडखे आदींनी पुढाकार घेतला होता.
दोन वर्षात ५० हजार हेक्टरचे अतिरिक्त सिंचन
जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांच्या पाटसऱ्याचे काम प्राधान्याने पूर्ण करून दोन वर्षांत ५० हजार हेक्टरवर अतिरिक्त सिंचन क्षमता निर्माण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. जलयुक्त शिवार अभियानामुळे ४ हजार ८७२ टीसीएम पाणीसाठा उपलब्ध झाला असून त्यातून ४ हजार १९३ हेक्टरवर शाश्वत सिंचनाची सोय झाल्याचेही बैठकीत सांगण्यात आले.
जिल्हा परिषदेतर्फे ग्रामीण भागातील शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियानाची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला यांनी बैठकीत दिली. दोन तालुके प्रगत झाल्याचे ऐकून मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच ५६५ शाळांमध्ये हे अभियान राबविले जात आहे. उर्वरित शाळाही प्रगत करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. जिल्ह्यातील कुपोषणातही घट झाल्याची माहिती मख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली.