कृत्रिम हातपायांसाठी १५५ दिव्यांगांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 11:35 PM2018-10-21T23:35:38+5:302018-10-21T23:36:29+5:30
लोकमत वृत्तपत्र समूह, साधू वासवानी मिशन पुणे, लायन्स क्लब कॉटन सिटी यवतमाळ, केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशन, वाधवाणी फार्मसी कॉलेज, जिल्हा पोलीस प्रशासन, लायन्स लिओ कॉटन सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने कृत्रिम हातपाय तपासणी शिबिर घेण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लोकमत वृत्तपत्र समूह, साधू वासवानी मिशन पुणे, लायन्स क्लब कॉटन सिटी यवतमाळ, केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशन, वाधवाणी फार्मसी कॉलेज, जिल्हा पोलीस प्रशासन, लायन्स लिओ कॉटन सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने कृत्रिम हातपाय तपासणी शिबिर घेण्यात आले. रविवारी पोलीस कवायत मैदानावर सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत १५५ दिव्यांगांची तपासणी करण्यात आली.
दुर्घटनेत हातपाय गमाविणारे, रक्तवाहिनींच्या विकाराने पीडित व्यक्ती आणि गँगरिंग झाल्याने अवयव गमावलेल्या व्यक्तींना सर्वसामान्य जीवन जगता यावे या उद्देशाने हे शिबिर घेण्यात आले. या शिबिरात साधू वासवानी मिशनचे प्रकल्प प्रमुख मिलिंद जाधव, सलील जैन यांच्यासह पाच तज्ज्ञ डॉक्टरांची चमू आली होती. या चमूने सकाळी ८ वाजतापासूनच दिव्यांगांचे कृत्रिम हातपाय बनविण्यासाठी तपासणी सुरू केली. शिवाय तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शनही केले. हे कृत्रिम हातपाय दीड महिन्यांच्या कालावधीनंतर लाभार्थ्यांना वितरित केले जाणार आहे. आलेल्या प्रत्येक दिव्यांगांची नोंदणी करून त्यांचा संपर्क क्रमांकही घेण्यात आला. कृत्रिम हातपाय वितरणाबाबत तारीख घोषित केली जाणार आहे. कृत्रिम हातपायाच्या सहाय्याने सामान्य जीवन जगता येऊ शकते, सर्व कामकाज करू शकतात, तेवढेच नव्हे तर सायकल, रिक्षा चालवू शकतात. त्यांना पळता, खेळता येते, नृत्यही करता येते.
या शिबिरातून अपंग नागरिकांना सामान्य जीवन जगण्याची मदत तसेच उमेद मिळते. त्यामुळेच जिल्हाभरातील दिव्यांग व्यक्ती या शिबिरात आले होते. सकाळी ८ ते २ ची ही निर्धारित वेळ असतानाही ग्रामीण भागातून येणाऱ्या दिव्यांगांसाठी दुपारी ४ वाजेपर्यंत तपासणी शिबिर चालले.
भावना गवळींची भेट
दिव्यांगांच्या शिबिराला खासदार भावना गवळी यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. कृत्रिम हातपायांनी किती फायदा होतो, हे दिव्यांगांकडून जाणून घेतले.