ऊर्जा राज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात १६ तासांचे भारनियमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 10:20 PM2018-11-21T22:20:09+5:302018-11-21T22:20:57+5:30
शेतकऱ्यांना कधी २४ तास तर कधी ओलितासाठी दिवसा पूर्ण दाबाचा वीज पुरवठा करण्याच्या घोषणा भाजपा-शिवसेना युती सरकारमधील अनेक मंत्र्यांकडून केल्या जातात. परंतु यवतमाळात खुद्द ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांच्या गृहजिल्ह्यातच शेतकऱ्यांना तब्बल १६ तासांच्या वीज भारनियमनाचा सामना करावा लागतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शेतकऱ्यांना कधी २४ तास तर कधी ओलितासाठी दिवसा पूर्ण दाबाचा वीज पुरवठा करण्याच्या घोषणा भाजपा-शिवसेना युती सरकारमधील अनेक मंत्र्यांकडून केल्या जातात. परंतु यवतमाळात खुद्द ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांच्या गृहजिल्ह्यातच शेतकऱ्यांना तब्बल १६ तासांच्या वीज भारनियमनाचा सामना करावा लागतो. त्यामुळे जीव धोक्यात घालून रात्रीला थंडीत कुडकुडत सिंचन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. याच प्रकारामुळे जिल्हाभरातील शेतकऱ्यांमध्ये भाजपा सरकार, या सरकारमधील मंत्री आणि महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनीविरुद्ध तीव्र असंतोष धुमसत आहे. या असंतोषाचा कोणत्याही क्षणी भडका उडण्याची व त्यातून संपूर्ण जिल्ह्यातच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहे.
वीज वितरणच्या वेळापत्रकानुसार तीन दिवस दिवसा व तीन दिवस रात्री कृषी फिडरवरून शेतकºयांंना वीज देण्याचे वेळापत्रक जाहीर केले गेले. परंतु प्रत्यक्षात हे वेळापत्रक पाळले जात नाही. तांत्रिक बिघाड व देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली भारनियमनाच्या नियोजित कार्यक्रमाव्यतिरिक्त तासन्तास विद्युत पुरवठा खंडित ठेवला जातो. वीज वितरण कंपनीच्या या लहरी कारभारामुळे जिल्ह्यातील एक लाख हेक्टरवरील पिकांचे सिंचन धोक्यात आले आहे. आधीच खरीप हंगाम बुडाल्यात जमा असताना आता रबीचा हंगामही केवळ वीज वितरणमुळे शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची चिन्हे दिसू लागली आहे. ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांच्या गृहजिल्ह्यातच वीज भारनियमनाचे हे हाल असेल आणि शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून रात्रीला ओलितासाठी जावे लागत असेल तर अन्य जिल्ह्यात काय परिस्थिती असेल याची कल्पनाच केलेली बरी.
केंद्र व राज्यातील भाजपा सरकार केवळ घोषणाबाज असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून केला जातो. त्या आरोपात आता बरेच तथ्य दिसू लागले आहे. वीज भारनियमनासाठी अनेक ठिकाणी विजेच्या चोºया व त्याला विद्युत यंत्रणेतीलच घटकांचे कुठे पाठबळ तर कुठे दुर्लक्ष कारणीभूत ठरत आहे.
वीज पुरवठा करताना उद्योगांना प्राधान्य दिले जाते. रात्रीला उद्योग बंद असतात. म्हणून त्यातून शिल्लक राहणारी वीज कृषीपंपाला पुरविली जाते. मग नाईलाजाने शेतकऱ्यांना रात्रीला ओलित करावे लागते.
अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंत्याचे दुर्लक्ष
भारनियमनाचे तास कमी करणे, त्यासाठी वीज चोऱ्या पकडणे, वीज गळती रोखणे, तांत्रिक बिघाड तत्काळ दुरुस्त करणे यासाठी वीज वितरणच्या अधीक्षक अभियंता, अमरावतीच्या मुख्य अभियंत्यांकडून वेगवान प्रशासकीय हालचाली होताना दिसत नाही. त्याचा परिणाम वीज वितरणच्या कारभारावर झाला आहे. अधिनस्त यंत्रणा मंद गतीने काम करताना दिसत आहे. तक्रार दिल्यानंतर शेतकऱ्यांना दुरुस्तीसाठी आठ-आठ दिवस लाईनमनची प्रतीक्षा करावी लागते. त्यातही अनेक ठिकाणी खासगी लाईनमनचा सर्रास वापर केला जातो.