१६ गावांतील नागरिकांची पाण्यासाठी पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 10:04 PM2018-04-12T22:04:18+5:302018-04-12T22:04:18+5:30
पूस प्रकल्पात पाणी असूनही ते मिळत नसल्याने १६ गावांतील नागरिकांनी येथील तहसीलसमोर उपोषण सुरू केले. नऊ हजार हेक्टर ओलिताची क्षमता असलेला लोअर पूस प्रकल्प नियोजनाच्या अभावामुळे आणि शासनाच्या दुर्लक्षामुळे कुचकामी ठरत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : पूस प्रकल्पात पाणी असूनही ते मिळत नसल्याने १६ गावांतील नागरिकांनी येथील तहसीलसमोर उपोषण सुरू केले.
नऊ हजार हेक्टर ओलिताची क्षमता असलेला लोअर पूस प्रकल्प नियोजनाच्या अभावामुळे आणि शासनाच्या दुर्लक्षामुळे कुचकामी ठरत आहे. पूस प्रकल्पातून पाणी मिळावे म्हणून १६ गावांतील नागरिक सतत संघर्ष करीत आहे. मात्र प्रकल्पाचे अधिकारी थातूरमातूर उत्तरे देऊन त्यांची बोळवण करीत आहे. उपाययोजना करण्याकडे सर्वांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे गुरूवारपासून येथील तहसीलसमोर ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले आहे. पोहंडूळ, इजनी, तिवरंग, धनोडा, खडका, लेवा, वाघनाथ, बारभाई, राउतवाडी, काऊरवाडी, हिवरा, दहिसावळी, चिखली, मलकापूर, भोसा येथील नागरिक या उपोषणात सहभागी झाले आहे.
लोअर पूसमधून कालव्यात पाणी सोडावे म्हणून सोमनाथ जाधव, ज्ञानेश्वर इनामदार, माणिक गोमासे, गजानन खापरकर, जावेद चव्हाण, जयवंता जाधव, डॉ. विजय रावते, रमेश राठोड, संजय सोळंके यांनी उपोषण सुरू केले आहे. त्यांनी ७ डिसेंबर रोजी उपोषण केले होते. त्यावेळी पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंत्यांनी पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन दिले होते. आठ दिवसांनी उपोषणाची सांगता झाली. मात्र अद्याप पाणी सोडण्यात आले नाही. त्याचा निषेध म्हणून नागरिकांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे.