१६४ धार्मिक स्थळे अनधिकृत

By admin | Published: January 12, 2016 02:08 AM2016-01-12T02:08:14+5:302016-01-12T02:08:14+5:30

यवतमाळ शहरातील १६४ अनधिकृत धार्मिक स्थळांचे निष्कासन केले जाणार असल्याची नोटीस नगरपरिषदेने जाहीर केली.

164 religious places are unauthorized | १६४ धार्मिक स्थळे अनधिकृत

१६४ धार्मिक स्थळे अनधिकृत

Next

यवतमाळ शहर : निष्कासनाच्या नोटीसने भाविकांमध्ये खळबळ
यवतमाळ : यवतमाळ शहरातील १६४ अनधिकृत धार्मिक स्थळांचे निष्कासन केले जाणार असल्याची नोटीस नगरपरिषदेने जाहीर केली. या नोटिसीमुळे संबंधित भाविक भक्तांमध्ये एकच खळबळ निर्माण झाली. या भक्तांनी आता आपले श्रद्धास्थान असलेल्या या धार्मिक स्थळांचे निष्कासन रोखण्यासाठी धडपड चालविली आहे. ही धार्मिक स्थळे वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात आक्षेप दाखल करण्याची तयारी क ाहे.
सार्वजनिक जागेवरील अनधिकृत धार्मिक स्थळांचा मुद्दा राज्य शासनस्तरावर गाजतो आहे. या धार्मिक स्थळांना नियमित करणे, स्थलांतरित करणे व निष्कासित करण्याचा कृती कार्यक्रम शासनाने जाहीर केला. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने अशा धार्मिक स्थळांच्या याद्या तयार केल्या असून त्याच्या कार्यवाहीसाठी नगरपरिषद सरसावली आहे. एकट्या यवतमाळ शहरातील १६४ धार्मिक स्थळांची सूचना नगरपरिषदेने रविवारी प्रकाशित केली. ही सर्व धार्मिक स्थळे निष्कासित केली जाणार आहे. त्यामुळे भाविक भक्त हादरले आहेत. या भाविकांनी आपले धार्मिक स्थळ सर्वात जुने असल्याचे दाखले देणे सुरू केले आहे. त्यासाठी पुराव्यांचीही जुळवाजुळव केली जात आहे. अनेक धार्मिक स्थळांचा ५० वर्षांपूर्वीचे असल्याबाबतचा कागदोपत्री पुरावा नाही. त्यावर पर्याय म्हणून तारुण्यापासून हे धार्मिक स्थळ पाहात वृद्धत्वाकडे झुकलेल्या व्यक्तींचे शपथपत्र घेण्याची तयारीही अनेकांनी चालविली आहे. आपले धार्मिक स्थळ वाचविण्यासाठी विविध ठिकाणी सभा, बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. यातील अनेक धार्मिक स्थळे सार्वजनिक जागेत असली तरी त्यांचा रहदारीस कोणताही अडथळा होताना दिसत नाही. त्यानंतरही त्याच्या निष्कासनाची नोटीस जारी झाल्याने भाविकांमध्ये रोष पाहायला मिळतो आहे. त्यातच विशिष्ट समाजाच्याच धार्मिक स्थळांचे निष्कासन का, असा मुद्दा जनतेत चर्चिला जात असून भविष्यात त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. विशेष असे निष्कासनाच्या निशाण्यावर असलेल्या १६४ धार्मिक स्थळांमध्ये बहुतांश हनुमान मंदिरांचा समावेश आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

मंदिरे वाचविण्यासाठी आज बैठक
नगरपरिषदेने यवतमाळ शहरातील १६४ अनधिकृत धार्मिक स्थळे निष्कासित करण्याची नोटीस जारी केली. त्या पार्श्वभूमीवर शहरातील मंदिरे वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू झाली आहे. ही मंदिरे सुरक्षित व नियमित करण्याबाबत चर्चा करण्यासाठी मंगळवार १२ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता बाजोरियानगर स्थित श्री स्वामी समर्थ मंदिरात बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी आक्षेप, सुरक्षितता व अर्जाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

असा आहे कार्यक्रम
२९ सप्टेंबर २००९ पूर्वीच्या अनधिकृत धार्मिक स्थळांना नोटीस जारी.
अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून ११ फेब्रुवारी २०१६ पर्यंत आक्षेप दाखल करणे.
११ मार्च २०१६ ला जिल्हा समितीकडे सुनावणी.
१६ मार्च २०१६ सुनावणीनंतरची अंतिम कार्यवाही.

Web Title: 164 religious places are unauthorized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.