१७ फुटाचे पांदण रस्ते सात फुटावर
By Admin | Published: June 14, 2014 02:36 AM2014-06-14T02:36:19+5:302014-06-14T02:36:19+5:30
शेतशिवारांना जोडणारे पांदण रस्ते गेल्या कित्येक वर्षांपासून अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे.
उत्तम चिंचोळकर गुंज
शेतशिवारांना जोडणारे पांदण रस्ते गेल्या कित्येक वर्षांपासून अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. १७ फुटाचा असलेला पांदण रस्ता अवघ्या सात फुटावर आला आहे.
साधी बैलगाडीही चालणे अवघड झाल्याने पांदण रस्त्यांवरून शेतकऱ्यांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवतात.
निसर्गाच्या अवकृपेने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. कधी अतिवृष्टी तर कोरडा दुष्काळ अशी स्थिती आहे. कर्जबाजारीपणा आणि नापिकीतून शेतकरी टोकाचा मार्ग
स्वीकारत आहे. अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने विविध योजना आखल्या आहेत. त्यातीलच पांदण रस्ता ही महत्वाची योजना आहे. शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत
वाहन गेल्यास पीक घरापर्यंत अथवा बाजारपेठेपर्यंत पोहोचविणे सोपे होते. तसेच शेतातील इतर कामांसाठी साहित्य नेण्यासही सुलभ होते. कोट्यवधी रुपये खर्च करून
जिल्ह्यात शेतशिवारात पांदण रस्ते निर्माण करण्यात आले. परंतु या पांदण रस्त्यांची शेतकऱ्यांनीच वाट लावली आहे.
अलिकडे पांदण रस्ते अतिक्रमाच्या विळख्यात अडकले आहे. १७ फुटाचे पांदण रस्ते सात फुटावर आले आहे. एका शेत सर्वेमध्ये चार ते पाच शेतकरी झाले आहे. त्यामुळे
पांदण रस्त्यावरून आत जाण्यासाठी रस्ता पुढचा शेतकरी ठेवत नाही. धुरासुद्धा वहितीत आणतो. त्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वाद होतात. वाद विकोपाला जाऊन
कोर्ट कचेऱ्याही होतात. पूर्वी शेतकऱ्यांजवळ मोठ्या प्रमाणात शेती होती. त्यामुळे पांदण रस्त्यावर अतिक्रमण होत नव्हते. परंतु आता शेतीचे तुकडे पडून प्रत्येकाजवळ कमीत
कमी शेती झाली आहे. त्यातही काहींची शेती धरण, रस्त्याने कमी झाली. मूळ एक शेताचे पाच ते सात मालक झाले. त्यामुळे प्रत्येकाचा जोर इंचन्इंच शेती कसण्याकडे
वाढला आहे. त्यातूनच सर्व प्रथम आक्रमण होते ते धुऱ्यावर नंतर पांदण रस्त्यावर.
पूर्वी सारखी आता पारंपारिक शेती केली जात नाही. मजूर टंचाईने यांत्रिकी पद्धतीने शेती करावी लागते.
यासाठी शेतात ट्रॅक्टर व इतर यंत्र सामुग्री नेण्यासाठी बारमाही पक्क्या रस्त्याची गरज असते. एक हेक्टर शेती असेल तरी शेतात रासायनिक खते, बी-बियाणे न्यावे लागते तर
शेतात निघालेले पीक बाजारपेठेपर्यंत न्यावे लागते. परंतु योग्य रस्ता नसल्याने वाद होतात. आणि त्यातून विकास खुंटतो. शासन शेतातील उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्नशील
आहे. कृषी विभाग आणि खासगी कंपन्या विकासाचे स्वप्न दाखवितात. परंतु पांदण रस्त्याच्या अतिक्रमणाबाबत कुणीही बोलत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत येत आहे.
पांदण रस्ते मोकळे करण्यासाठी पुढाकाराची गरज आहे.