एकाच महिन्यात रस्ता अपघाताचे १७ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 11:31 PM2018-03-30T23:31:17+5:302018-03-30T23:31:17+5:30

जिल्ह्यात मार्च महिन्यात झालेल्या वेगवेगळ्या रस्ता अपघातात १७ जणांचा बळी गेला. तर ५० जणांवर अपंगत्वाची वेळ आली. यवतमाळातील सिग्नलवर झालेल्या अपघाताने संपूर्ण जिल्हा हादरुन गेला होता, ...

17 road accidents in a month | एकाच महिन्यात रस्ता अपघाताचे १७ बळी

एकाच महिन्यात रस्ता अपघाताचे १७ बळी

Next
ठळक मुद्दे५० जणांना अपंगत्व : वेगाशी स्पर्धा आणि वाहतुकीचे नियम पायदळी

ज्ञानेश्वर मुंदे ।
ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : जिल्ह्यात मार्च महिन्यात झालेल्या वेगवेगळ्या रस्ता अपघातात १७ जणांचा बळी गेला. तर ५० जणांवर अपंगत्वाची वेळ आली. यवतमाळातील सिग्नलवर झालेल्या अपघाताने संपूर्ण जिल्हा हादरुन गेला होता, तर दुचाकीच्या अपघातात दोन प्राध्यापकांना आपला जीव गमवावा लागला. टिप्परखाली चिरडून नायगाव येथे झालेला चिमुकलीचा मृत्यू मन हेलावून सोडणारा होता.
वेगाशी स्पर्धा करीत वाहन चालविणे आणि वाहतुकीचे नियम पायदळी तुडविले की, अपघात निश्चितच होतो. जिल्हाभरात मार्च महिन्यात झालेल्या अपघातातही हीच कारणे आहेत. मार्च महिन्याची सुरुवात जवळा येथे एका ट्रकने तीन दुचाकींना धडक देऊन झाली. ५ मार्च रोजी झालेल्या अपघातात एक जण ठार तर पाच जण जखमी झाले. यवतमाळ शहरात ६ मार्चच्या रात्री दोन भरधाव कार एकमेकांवर आदळून अपघात झाला. सुदैवाने यात कुणी दगावले नाही. मात्र अपघाताची तीव्रता भीषण होती. पांढरकवडा तालुक्यातील इचोड गावाजवळ ९ मार्च रोजी एक वृद्ध अपघातात ठार झाला. तर उमरखेड तालुक्यात मार्लेगावजवळ दोन ट्रकच्या धडकेत छातीत लोखंडी रॉड शिरल्याने चालक दगावला. १४ मार्च रोजी वणी तालुक्यातील खांदलाजवळ दुचाकीस्वार दोघे जण अपघाताचे बळी ठरले. वणी तालुक्यातील करणवाडी येथे १५ मार्चला ट्रॅक्टर चालक ठार झाला तर जालना जिल्ह्यातील दुसरबीडजवळ झालेल्या अपघातात यवतमाळचे पं. शशीकांत शर्मा ठार झाले.
यवतमाळच्या बसस्थानक चौकातील सिग्नलवर १७ मार्च रोजी झालेल्या अपघाताने संपूर्ण यवतमाळ हादरुन गेले होते. दुचाकीवरील सासरे आणि सुनेला ट्रकने अक्षरश: चिरडले. या अपघातात दोन वर्षाची चिमुकली माही बचावली. या अपघातानंतर यवतमाळ शहरातील वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला. पोलिसांनी या अपघातातून धडा घेत ‘यु-टर्न’चा प्रयोग सुरू केला. नेर तालुक्यातील बाळेगावजवळ अ‍ॅपे आॅटोरिक्षा उलटून सात जण गंभीर जखमी झाले. २३ मार्च रोजी यवतमाळातील मेळावा आटोपून उमरखेडकडे जाताना माजी आमदार विजय खडसे जखमी झाले. त्यांच्या वाहनावर ट्रीपल सीट दुचाकी आदळली. ते तिघे तरुणही गंभीर जखमी झाले आहेत. २४ मार्चला शिरपूरजवळ चंद्रपूर जिल्ह्यातील तरुण दुचाकी अपघातात गतप्राण झाला.
२८ मार्चच्या पहाटे परभणी येथून चंद्रपूरच्या महाकाली दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या मेटॅडोअरला ट्रकने धडक दिली. त्यात एक महिला ठार तर २५ भाविक जखमी झाले. या अपघाताची शाई वाळत नाही तोच २९ मार्च रोजी कोसारा गावाजवळ भीषण अपघात झाला. टिप्परने दिलेल्या धडकेत मिनीडोअरमधील दोन जण जागीच ठार झाले. अपघात एवढा भीषण होता की, एका तरुणाचे डोके धडापासून वेगळे झाले होते तर दुसºया तरुणाच्या डोक्याचा अक्षरश: चेंदामेंदा झाला होता. याच दिवशी आॅटोरिक्षातून उतरुन रस्ता पार करताना एक चिमुरडी टिप्पर खाली आली. नऊ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. तिच्या मृत्यूने समाजमन हेलावून गेले.
जिल्ह्यातील या अपघाताच्या मालिकेने कुणाचे वडील, कुणाची आई तर कुणाचे भाऊ-बहीण दगावले. वाहन चालविताना झालेली थोडी चूक जीवावर बेतली. वाहतुकीच्या नियमांचे पालन केले तर निश्चितच अपघात टाळता येतात.
दोन प्राध्यापकांना गमवावा लागला जीव
मार्च महिन्यात दुचाकी अपघातात दोन प्राध्यापकांना आपला जीव गमवावा लागला. १४ मार्च रोजी पुसद तालुक्यातील बेलगव्हाण येथे दुचाकी स्लीप होऊन प्रा.डॉ.दिनेश भालेराव ठार झाले. तर वरोरा येथील आनंदनिकेतन महाविद्यालयाचे प्रा. अनिल नन्नावरे वणी-वरोरा मार्गावरील सावर्ला येथे अपघातात मृत्युमुखी पडले. त्यांना एसटी बसने धडक दिली. शिक्षण क्षेत्रात या दोघांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: 17 road accidents in a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात