१८ लाखांची अवैध देशी दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 10:05 PM2017-11-06T22:05:26+5:302017-11-06T22:05:51+5:30
पांढरकवडावरून करंजी, मारेगाव व वणीमार्गे एका १० चाकी ट्रकमधून अवैधरित्या चंद्रपूर जिल्ह्यात नेण्यात येणारी १८ लाख २० हजारांची अवैध दारू उपविभागीय पोलीस अधिकाºयांच्या पथकाने शहरालगतच्या केसुर्ली फाट्याजवळ पकडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : पांढरकवडावरून करंजी, मारेगाव व वणीमार्गे एका १० चाकी ट्रकमधून अवैधरित्या चंद्रपूर जिल्ह्यात नेण्यात येणारी १८ लाख २० हजारांची अवैध दारू उपविभागीय पोलीस अधिकाºयांच्या पथकाने शहरालगतच्या केसुर्ली फाट्याजवळ पकडली. याप्रकरणी ट्रकसह दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.ही कारवाई रविवारी रात्री करण्यात आली. मात्र हा दारूसाठा नेमका कुणाच्या मालकीचा आहे, या तस्करीचा मुख्य सूत्रधार कोण, हे शोधून काढणे पोलिसांपुढे मोठे आव्हान ठरणार आहे. पोलीस संबंधित दारूमाफियाचा शोध घेतात, की प्रकरण फाईलबंद करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या कारवाईत पोलिसांनी ट्रकचालक राजेंद्र सुरेश खारकर (२८) व विजय नामदेव येरेकर (२७) दोघेही रा.वांजरी (वणी) अशी अटकेतील युवकांची नावे आहेत. या दोघांना न्यायालयात रविवारी हे दोघेही ट्रक क्रमांक एम.एच.४०-एन.९६२१ ने दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात देशी दारूचा साठा घेऊन जात होते. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांना गोपनिय माहिती मिळताच, त्यांनी त्यांच्या पथकातील दिलीप अडकिने, महेंद्र भुते, रवींद्र इसनकर, आशिष टेकाडे, संतोष कालवेलवार, सादीक शेख, ठाणेदार बाळासाहेब खाडे, नफिस शेख, सुनिल खंडागळे, सुधीर पांडे, रत्नपाल मोहाडे, दीपक वांड्रसवार यांना माहिती दिली. त्यानुसार या पथकाने शहरालगतच्या केसुर्ली फाट्याजवळ सापळा रचला. दरम्यान, सदर ट्रक केसुर्ली फाट्याजवळ पोहोचताच ट्रकची तपासणी केली असता, ट्रकमध्ये दारूच्या ७०० पेट्या (१८ लाख २० हजार) आढळून आल्या. याप्रकरणी पोलिसांनी ट्रकसह एकुण २९ लाख २० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच राजेंद्र खारकर व विजय येरेकर या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पांढरकवडा बनतेयं दारू तस्करीचे मुख्य केंद्र
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर या जिल्ह्यात यवतमाळ, वणी, पांढरकवडा या तालुक्यांमधून मोठ्या प्रमाणावर दारूचा पुरवठा केला जात असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. मात्र चंद्रपूर पोलिसांनी वणीतील दारू तस्करांच्या ‘नांग्या’ मोडून काढल्याने आता पांढरकवडा शहरातून चंद्रपुरात मोठ्या प्रमाणावर दारूची तस्करी केली जात आहे. मार्गात लागणाºया पोलीस ठाण्यांना मोठी ‘बिदागी’ देत हे तस्कर चंद्रपुरात दारू पोहचवत आहे. रविवारी वणी पोलिसांनी केलेल्या कारवाईने ही तस्करी उघड झाली आहे.
पोलीस मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचणार काय?
साधारणत: दारूच्या कारवाईत केवळ वाहतूक करणाºयांना आरोपी करण्यात येते. मात्र ती दारू कुणाची, कुठून आणली, याचा तपास पोलिसांकडून जाणिवपूर्वक केला जात नाही. यात मोठे ‘डिलींग’ केले जाते. त्यामुळे वाहनाच्या चालकापर्यंतच दारूचे प्रकरण सिमीत राहते. मूळ मालक मात्र मोकाट सुटतो. वणी पोलिसांनी केलेल्या कारवाईतही तिच ‘री’ ओढली जाते की मालकाचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या जातात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.