१८ गावांचे पाणी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 10:18 PM2017-12-03T22:18:27+5:302017-12-03T22:18:55+5:30
पाऊस कमी झाल्याने कोरड्या पडलेल्या विहिरी आणि हातपंपाचा आधार तुटला असतानाच पाणी पुरवठा योजनेचीही वीज कापण्यात आली. परिणामी मालखेड वीज उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या १८ गावातील पाणी बंद झाले आहे.
पांडुरंग भोयर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सोनखास : पाऊस कमी झाल्याने कोरड्या पडलेल्या विहिरी आणि हातपंपाचा आधार तुटला असतानाच पाणी पुरवठा योजनेचीही वीज कापण्यात आली. परिणामी मालखेड वीज उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या १८ गावातील पाणी बंद झाले आहे. भर हिवाळ्यात नागरिकांना दिवस-रात्र पाण्यासाठी भटकावे लागत आहे. पाणीपुरवठा योजनेचे थकीत बिल भरले नसल्याने वीज पुरवठा तोडण्यात आला आहे.
उत्तरवाढोणा परिसरातील सोनखास, हेटी, सोनवाढोणा, घुई, मालखेड आदी गावातील विहिरी पूर्णपणे कोरड्या पडल्या आहेत. हातपंपाची पातळी कमालीची खोल गेली आहे. याशिवाय इतर गावांची परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. अशातच पाणीपुरवठा योजनेची वीज कापण्यात आली. १८ गावांमध्ये पाण्यासाठी हाहाकार माजला आहे.
मालखेड वीज उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या १८ गावातील ग्रामपंचायतीच्या नळ योजनांकडे मोठी रक्कम थकीत झाली आहे. वारंवार सूचना देऊनही ग्रामपंचायतीने रकमेचा भरणा केला नाही. त्यामुळे अशा योजनांची वीज चार दिवसांपूर्वी कापण्यात आली. या गावातील पाणीपुरवठा बंद झाला आहे. आता नागरिकांना गावशिवारात असलेल्या स्रोतांवरून पाणी आणावे लागत आहे. आतापासूनच सायकल, मोटरसायकल, गाडीबैलाद्वारे पाणी आणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. डिसेंबरच्या सुरुवातीपासूनच या परिसरातील काही गावांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. प्रशासनाने यावर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
सिंगनडोहचे पाणी सिंचनासाठी
उत्तरवाढोणा परिसरात असलेल्या सिंगनडोह तलावातील पाणी सिंचनासाठी ओढले जात आहे. तलावाच्या आजूबाजूला असलेल्या शेतासाठी पाण्याचा उपसा केला जात आहे. याविषयी पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांना पाण्याचा वापर थांबविण्याचे लेखी आदेश दिले आहेत. यानंतरही उपसा सुरूच आहे. भविष्यात निर्माण होणारा पाणीप्रश्न लक्षात घेता या उपाययोजना केल्या जात आहे. मात्र याला प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे.