लोकअदालतीमध्ये १८०२ खटले निकाली
By admin | Published: July 11, 2017 01:12 AM2017-07-11T01:12:02+5:302017-07-11T01:12:02+5:30
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने शनिवारी जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
आपसी तडजोड : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे आयोजन
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने शनिवारी जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यात जिल्हाभरातील १८०२ खटले आपसी तडजोडीने मिटविण्यात यश आले.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (सर्वोच्च न्यायालय दिल्ली) तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण (उच्च न्यायालय मुंबई) यांच्या निर्देशावरून ८ जुलै रोजी राष्ट्रीय लोकअदालत झाली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष संदीपकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आयोजन झाले.
लोकअदालतीत न्यायालयात प्रलंबित व वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. तसेच विविध राष्ट्रीयकृत बँकांची वादपूर्व प्रकरणेही ठेवण्यात आली होती. ही प्रकरणे मोठ्या संख्येने आपसी तडजोडीने मिटविण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष संदीपकुमार मोरे, सचिव अरविंद भंडारवार, व जिल्ह्यातील न्यायाधीशांनी परिश्रम घेतले. त्यासाठी वेळोवेळी वकील, शासकीय अधिकारी, पक्षकार, विविध संस्थेतील व राष्ट्रीयकृत बँकांतील पदाधिकाऱ्यांच्या बैठका बोलावल्या. त्यांना राष्ट्रीय लोकअदालतीचे महत्त्व पटवून दिले. जिल्ह्यामध्ये १६१७ प्रलंबित व १८५ वादपूर्व अशी एकूण १८०२ प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली निघाली. निकाली निघालेल्या प्रकरणांचे एकूण तडजोड मूल्य १ कोटी ६० लाख ३५ हजार २३७ होते.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच तालुका विधी सेवा समित्या, सर्व न्यायाधीश व कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. जिल्हाधिकारी, जिल्हा सरकारी वकील, सहायक सरकारी वकील, भूअर्जन अधिकारी, बेंबळा प्रकल्पाचे अधिकारी, सहकारी बँका, संस्थांचे अधिकारी, विमा कंपन्यांचे अधिकारी, पोलीस अधिकारी, नगरपरिषद मुख्याधिकारी, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष व इतर वकील मंडळी, जिल्ह्यातील न्यायालयीन कर्मचारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व तालुका विधी सेवा समितीचे कर्मचारी व इतर अनेकांनी यासाठी सहकार्य केले.