३७ हजार सभासदांचे अडकले १८५ कोटी; महिला सहकारी बँकेत गोरगरिबांचे पैसे अडकून

By सुरेंद्र राऊत | Published: August 13, 2024 06:44 PM2024-08-13T18:44:29+5:302024-08-13T18:45:00+5:30

महिला सहकारी बँक अपहार : मंगळवारी पहाटे दाखल झाला गुन्हा

185 crores stuck to 37 thousand members; Poor people's money stuck in Mahila Sahakari Bank | ३७ हजार सभासदांचे अडकले १८५ कोटी; महिला सहकारी बँकेत गोरगरिबांचे पैसे अडकून

185 crores stuck to 37 thousand members; Poor people's money stuck in Mahila Sahakari Bank

यवतमाळ : विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये विस्तारलेल्या येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेत गोरगरीब ठेवीदारांचे पैसे अडकून पडले आहेत. येथील संचालक मंडळ, मुख्याधिकारी, व्यवस्थापक, ऑडिटर यांनी कट रचून बनावट दस्तावेजाच्या आधारे मोठ्या रकमेची कर्ज उचल केली. यात २४२ कोटी रुपयांचा अपहार करण्यात आला. या प्रकरणात विशेष लेखापरीक्षकांनी दिलेल्या तक्रारीवरून मंगळवारी पहाटे तब्बल २०६ जणांवर शहरातील अवधूतवाडी पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

महिलांनी महिलांसाठी चालविलेली बाबाजी दाते महिला सहकारी बँक ही यवतमाळ जिल्ह्यातील पहिली बँक आहे. येथे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी सर्वच महिला होत्या. त्याच विश्वासाने या बँकेत रोजमजुरी करणाऱ्यांनी आपली कष्टाची कमाई ठेवली. सोबतच इतरही छोट्या पतसंस्थांनी त्यांच्या ठेवी या बँकेत ठेवल्या. विश्वासघात करीत बँकेचे संचालक मंडळ, अधिकारी, ऑडिटर यांनी बोगस कर्ज प्रकरणे तयार करून ठेवीची रक्कम हडपली. यातून बँक डबघाईस आली. सुरुवातीला बँकेचे ७२ हजार सभासद होते. बँकेच्या शाखा, नांदेड, अमरावती, हिंगणघाट, चंद्रपूर या जिल्ह्यातही होत्या. तब्बल २० शाखांमधून या बँकेचा कारभार चालत होता.

अपहार झाल्यानंतर बँक दिवाळखोरीत निघाली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महिला सहकारी बँकेचा बँकिंग परवानाही रद्द केला. त्यानंतर सहकार आयुक्त पुणे यांच्या आदेशावरून विशेष लेखापरीक्षकांनी कर्ज प्रकरणाची पडताळणी केली. तब्बल १४२ कर्ज प्रकरणात मोठी अनियमितता आढळून आली. त्यानुसार पडताळणीत १ ते ११ मुद्द्यावरून आरोप ठेवण्यात आले. यामध्ये तब्बल २०६ जणांचा समावेश आहे. यांनी १ एप्रिल २००६ ते ३१ मार्च २०२१ पर्यंत विविध व्यवहारातून, कर्ज प्रकरणातून अपहार केल्याची तक्रार देण्यात आली आहे. त्यावरून अवधूतवाडी पोलिसांनी कलम ४२०, ४०६, ४०९, ४१७, ४१८, ४२१, ४२४, ४६७, ४६८, ४७१, ४७७ (अ), १२० (ब) यासह महाराष्ट्र ठेवीदार सुरक्षा कायदा १९९९ च्या कलम ३ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे.

शब्द मर्यादेमुळे पोलिसांनी तक्रारीत घेतली २३ नावे

२४२ कोटी रुपयांच्या अपहारात अनेक दिग्गज अडकले आहे. व्यावसायिक, उद्योजक यांच्यासह राजकीय व्यक्तींचाही यामध्ये समावेश आहे. गरीब ठेवीदारांना लुबाडणाऱ्या आरोपींची नावे मोठ्या संख्येत आहे. पोलिसात फिर्याद दाखल करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सीसीटीएनएस प्रणालीत केवळ ८ हजार शब्द मर्यादा आहे. यामुळे तक्रारींमध्ये प्रमुख २३ जणांची नावे घेण्यात आली आहे. शब्द मर्यादेचा उल्लेख करीत आरोपींची इतर नावे सोबत जोडलेल्या लेखा परीक्षण अहवालात असल्याचे नमूद केले आहे.

"महिला सहकारी बॅंकेतील अपहार प्रकरणात लेखा परीक्षकांनी दिलेल्या तक्रारीवरून २०६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपहाराचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जाणार आहे."
- डॉ. पवन बनसोड, पोलिस अधीक्षक, यवतमाळ.

Web Title: 185 crores stuck to 37 thousand members; Poor people's money stuck in Mahila Sahakari Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.