जिल्ह्यातील १८७ पूल धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 09:33 PM2019-07-06T21:33:55+5:302019-07-06T21:34:32+5:30
गावांना शहराशी जोडणाऱ्या रस्त्यांवर ८६२ पूल उभारण्यात आले आहेत. यातील १८७ पूल धोकादायक असून डागडुजीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रादेशिक कार्यालयाकडे १५ कोटींची मागणी केली आहे. शिवाय, नवीन ३८ पुलांच्या बांधणीसाठी ११५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गावांना शहराशी जोडणाऱ्या रस्त्यांवर ८६२ पूल उभारण्यात आले आहेत. यातील १८७ पूल धोकादायक असून डागडुजीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रादेशिक कार्यालयाकडे १५ कोटींची मागणी केली आहे. शिवाय, नवीन ३८ पुलांच्या बांधणीसाठी ११५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
१६ तालुक्यांमध्ये हजारो किलोमिटर रस्त्यांचे जाळे आहे. अनेक वर्षांपासून उभे असलेले पूल पुरासह इतर कारणांमुळे डागडुजीला आले आहेत. काही पुलांच्या रेलींग तुटल्या आहेत. तर अनेक ठिकाणी सिमेंट कोटींगही निघाले आहे. या पुलांची डागडुजी करण्यासाठी बांधकाम विभागाला १५ कोटी रूपयांची गरज आहे.
प्रादेशिक कार्यालयाकडे निधीची मागणी नोंदविली आहे. मात्र, हा निधी अद्यापही जिल्ह्याकडे वळता झाला नाही. दुरूस्ती न झाल्यास पुलांची स्थिती पुढील वर्षी आणखी खराब होणार आहे.
पैनगंगा, अडाणवर नवे पूल होणार
जिल्ह्यात ३८ ठिकाणी नवीन पूल उभारले जाणार आहे. त्याकरिता ११५ कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये पैनगंगा नदीपात्रावर सर्वात मोठा ३०० मिटरचा पूल उभारण्यात येणार आहे. याकरिता २५ कोटी मंजूर झाले आहे. वणी ते चंद्रपूर मार्गावरील हा पूल दोन जिल्ह्यांना जोडणार आहे. तर अडाण नदीवर बोरीअरबमध्ये ८ कोटींचा नवा उंच व रूंद पूल होणार आहे.
रेलिंगविना रस्त्याचा अंदाजच येत नाही
रात्रीच्या वेळी वाहनांना पुलाच्या परिसरात हद्द कळण्यासाठी रेलींग आवश्यक आहे. अंधारात रस्त्याची हद्द वाहनचालकाच्या लक्षात न आल्यास अपघात होतो. पुराच्या वेळीही रस्त्याचा अंदाज चुकून नदीपात्रात वाहन जाण्याचा धोका आहे.
पुलाचे सायरन गुराख्याने पळविले
दोन वर्षांपूर्वी सात पुलांवर सायरन यंत्रणा लावण्यात आली. मात्र पुलाखाली लावलेले सायरनचे साहित्य एका गुराख्याने काढून नेले. यामुळे पाऊस नसतानाही अभियंत्यांना अलर्ट मेसेज आलेत. या ठिकाणी बांधकाम विभागाची यंत्रणा पोहचली. तत्पूर्वीच यंत्रसामुग्री गुल झाली होती.