कोम्बिंग आॅपरेशनमध्ये १९ पसार आरोपी गजाआड
By admin | Published: January 18, 2015 10:48 PM2015-01-18T22:48:14+5:302015-01-18T22:48:14+5:30
संपूर्ण यवतमाळ शहर ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्रभर कोम्बिंग आॅपरेशन राबविण्यात आले. यावेळी चौकाचौकात, रस्त्यावर आणि गल्लीबोळात पोलिसांना कर्तव्य बजावताना पाहून
यवतमाळ : संपूर्ण यवतमाळ शहर ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्रभर कोम्बिंग आॅपरेशन राबविण्यात आले. यावेळी चौकाचौकात, रस्त्यावर आणि गल्लीबोळात पोलिसांना कर्तव्य बजावताना पाहून ‘आॅल पुलिस इन रोड’चा प्रत्यय येत होता. शहर पोलिसांनी कोम्बिंगदरम्यान विविध गंभीर गुन्ह्यात पसार आणि पकड वॉरंट निघालेल्या एक, दोन नव्हे तर तब्बल १९ आरोपींना गजाआड केले.
रामेश्वर ऊर्फ भाऊराव बोखले, मुन्ना ऊर्फ आरीफ शहा रहीम शहा, अजय श्रीराम मिसाळ, विजय भाऊराव कुमरे, अंकुश हनुमान वाटकर, आमीन हिरालाल चौधरी, रघुनाथ ऊर्फ रघ्या भाऊराव नक्षणे, नितीन दादाराव खंडारे, गजानन नामदेव वानखडे, अविनाश ऊर्फ बबलू सहारे, सुनील उमेश इंगळे, राजू गोमाजी उईके, सलिम शहा ऊर्फ सागवान अशी विविध गुन्ह्यात पसार असलेल्या आणि कोम्बिंगदरम्यान अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
याव्यतिरिक्त न्यायप्रविष्ट प्रकरणात सतत तारखांवर गैरहजर राहून पकड वॉरंटमधील देवानंद पंजाबराव अढळ, शेख कमान, सुनील पंडीतराव धटे, रवी प्रभाकर वडेश्वर, पुरूषोत्तम मधुकर कामटे, विशाल रवींद्र डोंगरे या सहा जणांनाही अटक करण्यात आली. कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, शहर ठाणेदार दिलीप चव्हाण, एपीआय शिवाजी अहिरे, संग्राम ताटे, चंद्रशेखर कडू, फौजदार रितेश राऊत, राहुल किटे, जयप्रकाश निर्मल, शिल्पा निमकर आदींच्या नेतृत्वातील पथकाने सहभाग घेतला होता. याव्यतिरिक्त पोलीस मुख्यालयातील ५० पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही त्यात सहभाग होता. (स्थानिक प्रतिनिधी)