यवतमाळ पालिका क्षेत्रात 19 अनधिकृत वसाहती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 05:00 AM2020-11-20T05:00:00+5:302020-11-20T05:00:02+5:30
यवतमाळ शहरातील आंबेडकर नगर या वस्तीची न्यायालयीन लढाई सुरू आहे. दारव्हा रोडवरील अंबानगर, धामणगाव रोडवरील गौतमनगर, तलावफैल या ग्रीन झोनमध्ये अतिक्रमण आहे. याशिवाय उमरसरा परिसरात पाच, पिंपळगावमधील एक, लोहारा येथे चार, वडगाव परिसरात वाघाडी, जनकनगरी येथे अतिक्रमित वस्ती आहे. भोसा येथेही चार ठिकाणी खुल्या जागेत अतिक्रमित वस्त्या तयार झाल्या आहेत. यातील काही वस्त्यांमध्ये अनेक समस्या आहेत.
सुरेंद्र राऊत
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरात विस्तारापूर्वी २१ अनधिकृत वस्त्या होत्या. यातील बहुतांश वस्त्या नियमानुकूल करण्यात आल्या. आता शहराचा विस्तार झाल्यानंतर सात ग्रामपंचायती समाविष्ठ झाल्या. त्यामुळे अतिक्रमित वस्त्यांची संख्या पुन्हा वाढली आहे. १९ अतिक्रमित वस्त्या असून दहा हजार लोक त्यात वास्तव्याला आहे. काही वस्त्यांमध्ये प्रचंड समस्या आहेत. काही वस्त्या अवैध धंदे व गुन्हेगारांचे अड्डे बनल्या आहेत.
यवतमाळ शहरातील आंबेडकर नगर या वस्तीची न्यायालयीन लढाई सुरू आहे. दारव्हा रोडवरील अंबानगर, धामणगाव रोडवरील गौतमनगर, तलावफैल या ग्रीन झोनमध्ये अतिक्रमण आहे. याशिवाय उमरसरा परिसरात पाच, पिंपळगावमधील एक, लोहारा येथे चार, वडगाव परिसरात वाघाडी, जनकनगरी येथे अतिक्रमित वस्ती आहे. भोसा येथेही चार ठिकाणी खुल्या जागेत अतिक्रमित वस्त्या तयार झाल्या आहेत. यातील काही वस्त्यांमध्ये अनेक समस्या आहेत. अंबानगर, इंदिरानगर या वस्त्यांमध्ये भीषण स्थिती आहे. अतिक्रमित वस्त्यांमध्ये अवैध दारू विक्री व गुन्हेगारीला पोषक वातावरण पहायला मिळते.
अनधिकृत वसाहतीमध्ये अनेक सामाजिक स्वास्थ्याला घातक प्रवृती वाढत आहे. मात्र हा प्रभाव काही एका ठराविक भागापुरताच आहे. बऱ्याच ठिकाणी प्रामाणिकपणे मोलमजुरी करून गुजराण करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. अशा भागांमध्ये नगरपरिषदेकडून काही सुविधाही पुरविण्यात आल्या आहे.
वाढीव क्षेत्रात नगरपरिषदेेत आलेल्या पूर्वीच्या ग्रामीण क्षेत्रात आता सर्वाधिक अनधिकृत वस्त्या आहेत. उमरसरा भागात पाच वस्त्या असून दोन हजारांच्यावर लोक तेथे वास्तव्याला आहे. लोहारा येथे शिवाजीनगर, वाघापूर बायपास मागे, शिवनगर, स्मशानभूमी लगतच्या तलाव परिसरात अतिक्रमित वस्ती आहे. मात्र ग्रामपंचायतीने या भागात सुविधा दिल्या होत्या. त्यांच्याकडून करही वसूल केला जात आहे. पिंपळगावमध्ये सावर पांदण रस्त्यावर अतिक्रमित वस्ती आहे. वडगावमध्ये वाघाडी, जनकनगरी येथे जवळपास एक हजार घरे अतिक्रमित आहे. तेथे चार हजारांवर नागरिक वास्तव्याला आहेत.
अनधिकृत वस्त्यांमध्ये राहणाऱ्यांचे पुनर्वसन काही प्रमाणात करणे शक्य आहे. शहरात तीन हजार घरकुल मंजूर झाले आहे. आता अतिक्रमण वाढू नये यासाठी स्वतंत्र पथक तयार केले आहे. जुन्या अनधिकृत वस्त्यांबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा लागणार आहे. ही समस्या हाताळण्यासाठी संवेदनशीलता गरजेची आहे. अनेक वर्षापासूनचे अतिक्रमण काढण्याकरिता पर्याय ठेवणेही आवश्यक आहे. त्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे.
- सुनील बल्लाळ
मुख्याधिकारी, नगरपरिषद.
आम्ही अनेक वर्षांपासून या वस्तीमध्ये राहतो. घरकुलासाठी नगरपरिषदेकडे अर्ज केला. आम्हाला घरकूल मिळणार असल्याचे सांगण्यातही आले. मात्र अजूनही कशाचाच पत्ता नाही. आमच्या भागात खंब्यावर लाईट लागत नाही. शौचालय नीटनेटके नाहीत. पिण्याचे पाणी मिळत नाही. रस्ता रुंदीकरणात लाईन कट झाली. तेव्हापासून पाण्याचे हाल आहे. नळाचे कनेक्शन कटले आणि नळाचे बिल सुरू झाले. चार हजार रुपयांचे बिल आम्हाला मिळाले. आता पाणीच नाही, आम्ही इतकाले बिल कोठून भरायचे असे मत या भागातील नागरिकांनी व्यक्त केले.
- कल्पना संजय कुटे
नागरिक, वाघापूर