१९८ ग्रामपंचायतींच्या नळ योजनेची वीज तोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 09:39 PM2018-02-22T21:39:56+5:302018-02-22T21:40:27+5:30
अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असताना थकीत वीज बिलापोटी जिल्ह्यातील तब्बल १९८ ग्रामपंचायतीच्या नळ योजनांचा वीज पुरवठा तोडण्यात आला. वीज वितरण कंपनीच्या या कारवाईने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असताना थकीत वीज बिलापोटी जिल्ह्यातील तब्बल १९८ ग्रामपंचायतीच्या नळ योजनांचा वीज पुरवठा तोडण्यात आला. वीज वितरण कंपनीच्या या कारवाईने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे गावागावातील कायदा व सुव्यवस्था हाताबाहेर जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनेचे वीज बिल थकीत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे बिल थकीत आहे. सध्या सत्तारुढ असलेल्या सरपंचावर या बिलाचा भार येऊन पडला आहे. आधीच ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती बिकट आहे. अशा परिस्थितीत बिल कसे भरावे, असा प्रश्न आहे. दुसरीकडे अपुऱ्या पावसाने पाणीटंचाईचे संकट घोंगावत आहे. याबाबत ग्रामपंचायतींनी वीज वितरण कंपनीला विनंती करून पाणीटंचाईच्या काळात वीज पुरवठा खंडित करू नका, असे म्हटले आहे. मात्र कंपनीने थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी थेट वीज पुरवठा तोडण्याची कारवाई सुरू केली आहे. जिल्ह्यातील तब्बल १९८ ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांमध्ये असंतोष खदखदत आहे. तर विरोधी गट याचा राजकीय फायदा घेत आहे. त्यामुळे गावातील कायदा व सुव्यवस्था हाताबाहेर जाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
थकीत वीज बिलासाठी सरपंचांनी गटविकास अधिकाऱ्यांपासून ते वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यापर्यंत सर्वांना विनंती केली आहे. मात्र वीज वितरण कंपनीने थकीत बिलाची ७५ टक्के रक्कम भरावीच लागेल, असा पवित्रा घेतला. त्यामुळे ग्रामपंचायती हतबल झाल्या आहेत. १४ व्या वित्त आयोगातून वीज बिल भरायचे म्हटले तर गटविकास अधिकारी त्याला विरोध करीत आहे. ग्रामपंचायतीजवळ वसुलीची रक्कमही अपुरी आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या काही अधिकाºयांनी सरपंचांना वीज बिल भरण्यासाठी स्वत:च्या क्रेडीटवर कर्ज उभारण्याचा सल्ला दिला. त्यामुळे सरपंच चांगलेच अडचणीत आले आहे. दुसरीकडे वीज पुरवठा खंडित झाल्याने संपूर्ण गाव पाणीटंचाईने होरपळत आहे. गावकरी पाण्याच्या शोधात भटकंती करीत आहे.
सरपंचांची वीज वितरणकडे धाव
थकीत वीज बिलापोटी वीज पुरवठा खंडित केल्याने अनेक गावातील सरपंच गुरुवारी यवतमाळ येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात धडकले. त्यांनी कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली. तासभर सरपंच या कक्षात ठिय्या देऊन होते. यावेळी दारव्हा तालुक्यातील अनेक गावातील सरपंच उपस्थित होते. त्यात चिकणीचे सरपंच नीलेश राऊत, चाणीचे सदस्य सुशील ठोकळ, बानायतचे सरपंच संदीप देवकते, कामठवाड्याचे सरपंच प्रतिनिधी उमेश उके यांचा समावेश होता.