पाळण्याने घेतला दोन चिमुकल्यांचा जीव, अंगावर खांब कोसळून बहिण-भावाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2022 12:48 PM2022-03-24T12:48:49+5:302022-03-24T12:59:55+5:30
सिमेंटचा खांब अचानक कोसळला. तो प्राचीच्या डोक्यावर आदळला, त्यामुळे ती जागीच गतप्राण झाली. तर, झोक्याची दोरी तुटल्याने तेजससुद्धा जमिनीवर फेकला गेला.
पुसद (यवतमाळ) : येथे सहा महिन्यांच्या भावाला पाळण्याचा झोका देत असताना अंगावर खांब कोसळून नऊ वर्षीय बहीण जागीच ठार झाली. तर गंभीर जखमी झालेला सहा महिन्यांचा चिमुकला उपचाराला नेत असताना वाटेतच मृत्यू पावला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी घडली.
प्राची विजय घुक्से (९ वर्षे) आणि तेजस विजय घुक्से (६ महिने) अशी मृत बहीण-भावाची नावे आहे. येथील लक्ष्मीनगरमधील अमित बोरले यांचे शेत विजय कचरू घुक्से यांनी बटईने केले आहे. ते परिवारासह झोपडी वजा घरात शेतातच राहतात. मंगळवारी प्राची आपल्या सहा महिन्यांच्या लहान भावाला झोक्यावर झुलवत होती. त्यावेळी झोक्याची एक दोरी तुटली लोखंडी खांबाला तर दुसरी दोरी सिमेंट खांबाला बांधलेली होती. यात सिमेंटचा खांब अचानक कोसळला. तो प्राचीच्या डोक्यावर आदळला, त्यामुळे ती जागीच गतप्राण झाली. तर, झोक्याची दोरी तुटल्याने तेजससुद्धा जमिनीवर फेकला गेला.
अचानक झालेल्या आवाजाने मुलांची आई बाहेर आली. शेतात जवळच काम करणारे वडील विजयदेखील धावत आले. त्यांनी दोघांनाही तत्काळ रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी प्राची मृत झाल्याचे घोषित केले. गंभीर जखमी तेजसला नांदेड येथे हलविण्याची डॉक्टरांनी केली. त्यानुसार त्याला नांदेडला नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, विजय घुक्से यांना तीन मुलींच्या पाठीवर सहा महिन्यांपूर्वीच एकुलता एक मुलगा झाला होता. अचानक घडलेल्या या घटनेत दोन्ही लगानग्या बहिण-भावाचा मृत्यू झाल्याने घुक्से परिवारावर आभाळच कोसळले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.