कारागृहातून सुटताच त्याने पुन्हा फोडले घर; नवी दुचाकी खरेदी केली अन् सापडला जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 02:16 PM2022-12-23T14:16:17+5:302022-12-23T14:17:23+5:30
अरुणोद्य सोसायटीतील चोरीप्रकरणी दोघे अटकेत; २२ लाखांचा मुद्देमाल जप्त
यवतमाळ : शहरात मोठ्या प्रमाणात घरफोडीच्या घटना होत आहे. ९ डिसेंबरला अरुणोदय सोसायटीत चोरट्यांनी बंद घर फोडून ३८ तोळे सोने आणि सात लाखांची रोख लंपास केली. यापूर्वी रंगोली गार्डनजवळ सप्टेंबर महिन्यात बंद घर फोडून २० लाखांचा मुद्देमाल पळविला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन्ही घटनांवर लक्ष केंद्रीत करून तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज व गुन्ह्याची पद्धत यावरून संशयितांना ताब्यात घेतले. त्यांनी २२ लाख ६७ हजारांचा मुद्देमाल काढून दिला. आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे.
शेर अली ऊर्फ रहीम मोती सय्यद रा. इंदिरानगर यवतमाळ, विक्की किसनराव सारवे (२४) रा. गौतम नगर स्टेट बॅंक चौक यवतमाळ असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. यातील शेर अली हा खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात होता. जुलै महिन्यात तो जामिनावर बाहेर आला. यानंतर त्याने साथीदाराला सोबत घेऊन सुखवस्तू घरांची रेकी करणे सुरू केले. बंद घरांना हेरून रात्रीचा डाव साधत होता. सीसीटीव्ही कॅमेरा लागलेला आहे, हे हेरून आरोपी पूर्ण चेहरा व शरीर झाकून चोरी करीत होते. गोपनीय माहिती व तांत्रिक बाबींचा आधार घेऊन आरोपींची ओळख पटविण्यात आली. पोलिसांनी त्यांच्याकडून ३०९ ग्रॅम सोने आणि दोन लाखांची रोख असा २२ लाख ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
याच चोरट्यांनी प्रदीप लाखानी यांच्याकडेही घरफोडी केल्याची कबुली दिली. चोरटे दिवसा बंद घरांवर पाळत ठेवून रात्री हातसाफ करीत होते, असे त्यांनी सांगितले. या आरोपींना पोलिस कोठडीत ठेवून त्यांच्याकडून लाखानी यांच्या घरून गेेलेला मुद्देमाल हस्तगत करायचा आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर अधीक्षक पीयूष जगताप, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केला.
आरोपीला इंदिरानगरामधून उचलले
घरफोडीच्या गुन्ह्यात आरोपीने कोणताच पुरावा सोडला नाही. त्यामुळे पोलिसांनी वेगळ्या पद्धतीने तपास सुरू केला. खबऱ्याच्या माध्यमातून आरोपी शेर अली याची नवी कोरी दुचाकी नजरेत आली. त्यानंतर १५ दिवस पाळत ठेवून हालचाली टिपल्या. दिवसाचा खर्च, मित्रांवर होणाऱ्या पार्ट्या यावरून संशय बळावत गेला. आरोपीला इंदिरानगरमधून पहाटे ताब्यात घेतल्यानंतर त्याने मुद्देमाल काढून देत कबुली दिली.
आरोपीने थाटले कापड दुकान
पोलिसांना संशय येऊ नये म्हणून आरोपीने वडगाव परिसरात कापड दुकान थाटले होते. या व्यवसायातूनच मोठे उत्पन्न मिळत असल्याचे शेर अली हा सांगत होता. पोलिस कारवाईतून त्याचे बिंग फुटले. नामधारी थाटलेले दुकान व प्रत्यक्ष शेर अली याचे राहणीमान यात तफावत आढळून आली.
चंद्रपूर पोलिसांनीही घेतले होते ताब्यात
आरोपी अल्पवयीन असताना तो घरफोडी करणाऱ्या टोळीच्या सहवासात राहत होता. तेथे सहायक निरीक्षक विवेक देशमुख कार्यरत असताना त्यांनी याची चौकशी केली होती. यानंतर २०१९ मध्ये डिसेंबर महिन्यात यवतमाळात वाघापूर येथे विनय राठोड याचा खून झाला. त्यातही आरोपी शेर अली याचा सहभाग असल्याचे आढळून आले होते. त्याच गुन्ह्यात शेर अलीला कारागृहात डांबण्यात आले होते.