तार चोरांच्या तब्बल २० टोळ्या
By admin | Published: December 22, 2015 03:42 AM2015-12-22T03:42:31+5:302015-12-22T03:42:31+5:30
वीज वितरण कंपनीचे ट्रान्सफार्मर आणि खांबांवरून तांबा तारांची चोरी करणाऱ्या एक-दोन नव्हे तब्बल २० पेक्षा
आरोपीची कबुली : म्होरक्या राजकीय पदाधिकाऱ्यापुढे पोलीस हतबल
यवतमाळ : वीज वितरण कंपनीचे ट्रान्सफार्मर आणि खांबांवरून तांबा तारांची चोरी करणाऱ्या एक-दोन नव्हे तब्बल २० पेक्षा अधिक टोळ्या जिल्ह्यात सक्रिय असल्याची खळबळजनक कबुली आरोपीने दिली. शिवाय या टोळ्यांकडून चोरीतील मालाची खरेदी करणारा म्होरक्या राजकीय पक्षाचा पदाधिकारी निघाला आहे. पोलिसांनी अद्याप त्याला रेकॉर्डवर घेतले नसून त्याच्यापुढे वरिष्ठ पोलीस प्रशासन हतबल झाल्याचे सांगितले जाते.
शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक तांबा चोरट्यामुळे हैराण झाले आहेत. दररोच प्रत्येक ठाण्यात एकतरी तक्रार मोटरपंप अथवा रोहित्र चोरी गेल्याची दाखल होते. या तक्रारींचा पाठपुरावा करणारे नसल्याने त्याची फारसी दखल घेतली जात नाही. अपवादानेही तांबा तार चोरीचा गुन्हा उघडकीस आणत नाही. ग्रामस्थांनीच चोरट्याला पकडून ताब्यात दिल्यानंतर केवळ कारवाईचा सोपस्कार पार पाडला जातो. चोरीच्या गुन्ह्यात न्यायालयात लवकर जामीन मिळतो. त्यामुुळे तांबा चोरट्यांचे रॅकेट वाढतच आहे. यवतमाळ या जिल्हा मुख्यालयातून संपूर्ण जिल्हाभरातील ग्रामीण भाग या टोळीचे कार्यक्षेत्र आहे. तीन ते चार सदस्य असलेल्या या टोळ््या एक रात्रीतून लाखो रुपयांची तांबा तार लंपास करतात.
शेतातील विहिरीत असलेली मोटरपंप काढून त्याली तांबा तार चोरण्यात येते. शक्य झाल्यास संपूर्ण मोटरपंपच लंपास करण्यात येतो. या टोळ््यांकडून ‘मारोती ओमनी’ यासारख्या वेगवान वाहनाचा उपयोग केला जातो. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आपला एक पंटर पाठवून चोरीची गाडी खरेदी करण्यासाठी फिल्डींग लावली. याला शे. अब्रार शे. ईस्माईल गळाला लागला. त्याने सहा हजार रुपयात चोरीची गाडी देण्याचे मान्य केले. त्यानंतर लगेच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. आरोपीने तांबा चोरीची कबूल देऊन हे रॅकेट कसे चालचे याची संपूर्ण माहिती दिली. आरोपी हा त्याचा समीर नामक भाऊ आणि मास्टर मार्इंड दोघे रा. कळंब हे अद्याप फरार आहेत.
पोलिसांनी केवळ आठवडी बाजार परिसरातील भंगार दुकानात काम करणाऱ्या नोकरांना ताब्यात घेतले आहे. चोरीचा माल घेणारे आतीफभाई आणि हसनभाई हे अजूनही फरार आहेत. चोरट्यांकडून २६० रुपये किलोप्रमाणे तांबा तारेची खरेदी केली जाते. या सर्व नेटवर्क मागे शहरातील राजकीय प्रतिष्ठीतांचे पाठबळ आहे. मात्र ठोस पुुरावे आणि राजकीय दबावामुळे पोलीस त्याच्या गोदामाची झडतीसुध्दा घेऊ शकत नाही. वरिष्ठ पोलीस आधिकारी त्यासाठी परवानगी देण्यास तयार नाही. याच कारणाने आजपर्यंत तांबा चोरीतील मुख्य आरोपीपर्यंत पोहोचता आले नाही. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक कडू, पोलीस उपनिरीक्षक राजू वटाणे, सचिन घुगे, संजय दुबे, ऋषी ठाकूर, हरिश राऊत, गजू डोंगरे, विशाल भगत, भोजराज करपते, किरण पडघण यांनी सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. एक लाख ५९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये रोहित्राचे लोखंडी भाग, ताब्यांची टॉवर केबल ८५ किलो, अॅल्युमिनियम तार ३५ किलो , दहा बॅटऱ्या, इलेक्ट्रीक पॅकिंगपट्टी ७५० किलो आदी साहित्य ताब्यात घेतले. आता म्होरक्याच्या शोधता पोलीस आहेत. तपासातील अडचणी दूर झाल्यास त्यालाही ताब्यात घेण्यात यश येईल, असा विश्वास पोलिसांना आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
वीज प्रवाह खंडित करून पाडले जाते ट्रान्सफार्मर
४वीज प्रवाह चालू असताना तो खंडित करून ट्रान्सफार्मर जमिनीवर पाडले जाते. त्यानंतर त्यातील तांबा तार व इतर लोखंडी साहित्या काढून घेतात. इतकेच नव्हे वीज प्रवाह असलेल्या अॅल्युुमिनियम तारासुध्दा कापून नेल्या जातात. वीज प्रवाह सुरू असताना चोरी करणाऱ्यास मास्टर असे संबोधले जाते. उर्वरित दोन ते तीन सदस्य खाली पाडलेल्या साहित्यातील तांबा तार काढण्याचे काम करतात.