पांढरकवडातून सायाळ प्राण्याचे २० किलो मांस जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 10:41 PM2021-02-23T22:41:18+5:302021-02-23T22:41:28+5:30
इंदिरानगर परिसरातील वार्ड क्रमांक सहामध्ये वनाधिकाऱ्यांनी धाड टाकून सायाळ या वन्यप्राण्याचे नऊ नगाचे २० किलो मांस जप्त केले.
पांढरकवडा (यवतमाळ) : शहरातील इंदिरानगर परिसरातील वार्ड क्रमांक सहामध्ये वनाधिकाऱ्यांनी धाड टाकून सायाळ या वन्यप्राण्याचे नऊ नगाचे २० किलो मांस जप्त केले. पांढरकवडा वनविभागात मोराची शिकार व वन्यप्राण्यांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर उपवनसंरक्षक किरण जगताप यांनी खबऱ्यांचे नेटवर्क वाढवून आरोपींविरूद्ध कठोर कारवाई करणार, अशी भूमिका व्यक्त केली होती.
त्याचीच प्रचिती वनविभागाने सोमवारी केलेल्या कार्यवाहीवरून दिसून आली. वनविभागाला मिळालेल्या गोपिनय महितीवरून उपवनसंरक्षक कार्यालयाच्या २०० मीटर अंतरावर खुल्या पटांगणावर सायाळ या वन्यप्राण्यांचे मांस विकले जात होते. याबाबत माहिती मिळताच वनविभागाने कारवाई करून नऊ सायाळ प्राण्याचे एकूण २० किलो मांस जप्त करण्यात आले. परंतु यावेळी आरोपी मात्र पसार होण्यास यशस्वी झाला. त्याचा शोध आता वनविभागाचे पथक घेत आहेत.