२० लाखांचे डिलिंग; शिक्षण उपसंचालकांसह संस्थाचालकावर फसवणुकीचा गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 10:50 AM2023-11-03T10:50:37+5:302023-11-03T10:50:50+5:30
विनावेतन सहायक शिक्षकाची बॅकडेट नियुक्ती
यवतमाळ : तालुक्यातील मेंढला येथील एकता बहुद्देशीय संस्थेद्वारा संचालित शाळेवर विनावेतन सहायक शिक्षक म्हणून नियुक्तीसाठी २० लाखांची डिलिंग झाली. त्यात यवतमाळचे तत्कालीन शिक्षणाधिकारी व सध्या पुणे येथे शिक्षण संचालनालयातील अंदाज व नियोजन विभागाचे उपसंचालक, म्हणून कार्यरत असलेल्या दीपक चवणे यांच्यासह पाच जणांविरोधात संबंधित शिक्षकाने फसवणूक झाल्याची तक्रार दिली. त्यावरून बुधवारी यवतमाळ ग्रामीण पोलिस ठाण्यात उपसंचालकासह पाच जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
सलीम जाहीद खान (रा. मिटनापूर, ता. बाभूळगाव) या युवकाला विनावेतन सहायक शिक्षक म्हणून नियुक्तीसाठी पैशाची मागणी करण्यात आली. २०१५ पासूनचा नियुक्ती आदेश देण्याकरिता २० लाख रुपयांचे डिलिंग करण्यात आले. मेंढला येथील एकता बहुद्देशीय संस्थेद्वारा संचालित शाळेवर नियुक्ती देण्याचे ठरले. व्यवहार झाल्याप्रमाणे शिक्षण उपसंचालक दीपक चवणे, संस्थेचे संस्थापक दिलीप माणिकराव वासेकर, संचालक मंडळातील सदस्य सुजाता दिलीप वासेकर, राजेंद्र केशवराव कांबळे, भगवान केंगार, विनायक वासेकर यांच्याविरोधात फसवणूक झाल्याची तक्रार सलीम खान याने दिली. याप्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी शिक्षण उपसंचालकांसह पाच जणांविरुद्ध कलम ४२०, ५०६, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल केला. याचा तपास यवतमाळ ग्रामीण ठाणेदार प्रकाश तुनकलवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक प्रेमसिंग चव्हाण करीत आहेत.
यवतमाळ शिक्षण विभागाचा बाबू नांदेडला
यवतमाळचे तत्कालीन शिक्षणाधिकारी व सध्याचे शिक्षण उपसंचालक पुण्यावरून नांदेडात आल्यानंतर बॅकडेटच्या आदेशासाठी यवतमाळ येथील बाबूला पाचारण करतात. अशा फायली नियमित जातात. यामध्ये सर्वाधिक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती आदेशाचा समावेश आहे. खासगी संस्थांवर पैसे घेऊनच नियुक्ती दिली जाते. हा व्यवहार सर्वश्रुत आहे. पदोन्नतीनंतरही उपसंचालकांकडून बॅकडेटच्या आधारे नियुक्त्या केल्या जात असलेल्या कारभाराची चौकशी केल्यास गैरप्रकाराचे मोठे घबाड बाहेर येईल, अशी चर्चा शिक्षण वर्तुळात सुरू आहे. एका आदेशासाठी अडीच ते तीन लाख किंमत मोजली असल्याचेही आता सांगण्यात येत आहे.