कोरोनाचा होतोय गुणाकार, जिल्ह्यात 20 जण नव्याने पॉझेटिव्ह तर दोघांना डिस्चार्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 06:39 PM2020-07-11T18:39:17+5:302020-07-11T18:42:52+5:30
जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत 101 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह होते. यात आज (दि. 11) 20 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडल्याने हा आकडा 121 झाला
यवतमाळ : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. शनिवारीसुध्दा जिल्ह्यात 20 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून यात 13 पुरुष आणि सात महिलांचा समावेश आहे. तर आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व सुरवातीला पॉझेटिव्ह आलेले दोन जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. आज (दि. 11) नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या नागरिकांमध्ये यवतमाळ शहरातील तायडे नगर येथील एक पुरुष व एक महिला, लहान वडगाव येथील तीन पुरुष व दोन महिला आणि यवतमाळ येथील आणखी एक महिला आहे. दिग्रस शहरातील बालाजी नगर येथील एक पुरुष, बाराभाई मोहल्ला येथील एक महिला, देवनगर येथील एक महिला तसेच दिग्रस येथील सहा पुरुष, पुसद शहरातील गांधी वॉर्ड येथील एक पुरुष, पांढरकवडा शहरातील शास्त्री वॉर्ड येथील एक पुरुष आणि पुसद येथील एका महिलेचा समावेश आहे.
जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत 101 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह होते. यात आज (दि. 11) 20 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडल्याने हा आकडा 121 झाला. मात्र 'पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह' झालेल्या दोन जणांना सुट्टी झाल्यामुळे सद्यस्थितीत ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 119 झाली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला शनिवारी एकूण 306 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 20 पॉझेटिव्ह, 268 निगेटिव्ह तर 18 नमुन्यांचे अचूक निदान झाले नाही. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 417 आहे. यापैकी 285 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत 13 मृत्युची नोंद आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने आज 80 नमुने तपासणीकरीता प्रयोगशाळेत पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत 6928 नमुने पाठविले असून यापैकी 6778 प्राप्त तर 150 अप्राप्त आहेत. जिल्ह्यात 6361 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.