२० रेती तस्करांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 11:14 PM2017-12-14T23:14:49+5:302017-12-14T23:15:02+5:30
तालुक्यातील पैनगंगा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी सुरू असून उमरखेड महसूल पथकाने गुरुवारी पहाटे कोप्रा येथील रेतीघाटावर धाड टाकून २० रेती तस्करांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : तालुक्यातील पैनगंगा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी सुरू असून उमरखेड महसूल पथकाने गुरुवारी पहाटे कोप्रा येथील रेतीघाटावर धाड टाकून २० रेती तस्करांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सर्व तस्कर हे मराठवाड्यातील असून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
उमरखेड तालुक्यातील कोप्रा नदी पात्रातून मराठवाड्यातील हिमायतनगर येथील तस्कर रेती चोरत असल्याची गोपनीय माहिती उमरखेड महसूल विभागाला मिळाली. गुरुवारी पहाटे ४ वाजता पथक प्रमुख तलाठी दत्तात्रय दुर्केवार व कर्मचाºयांनी कोप्रा घाट गाठला. त्यावेळी अनेकजण वाहनाद्वारे रेती तस्करीत करीत असल्याचे आढळले. पथक पोहोचताच अंधाराचा फायदा घेवून तस्कर वाहनासह पसार झाले. त्यापैकी एका ट्रॅक्टरचालकास पकडले. घटनेची तक्रार तलाठी दत्ता दुर्केवार यांनी उमरखेड ठाण्यात दिली. त्यावरून आरोपी अब्दुल बाकी हाजी अब्दुल करीम, परमेश्वर मारोती गायकवाड, देवानंद पांडुरंग गायकवाड यांच्यासह २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
ही कारवाई ठाणेदार हनुमंत गायकवाड यांनी केली. आरोपी देवानंद गायकवाडला अटक केली. या घटनेने महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.
पैनगंगा नदीतून खुलेआम तस्करी
उमरखेड तालुक्यातील पैनगंगा नदीपात्रातून खुलेआम रेती तस्करी सुरू आहे. या तस्करांची हिम्मत एवढी वाढली आहे की धाड टाकण्यास गेलेल्या पथकावर हल्ला करतात. गुरुवारी पहाटेही तस्करांनी हल्ला केला. विशेष म्हणजे उमरखेडचे तहसीलदार भगवान कांबळे यांनी तस्करांविरुद्ध मोहीम उघडली आहे. परंतु तस्करांच्या आक्रमक भूमिकेमुळे पथक निष्प्रभ ठरले आहे.
अवैध गौण खनिजाचे उत्खनन करणाºया तस्करांच्या मुस्क्या आवळण्यासाठी फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहे. अनेक तस्कर महसूल प्रशासनाच्या रडावर असून रेती चोरट्यांची गय केली जाणार नाही.
- भगवान कांबळे
तहसीलदार, उमरखेड