एकाच रात्री २० चोऱ्या
By admin | Published: June 11, 2014 12:16 AM2014-06-11T00:16:35+5:302014-06-11T00:16:35+5:30
दारव्हा रोडवर पोलिसांच्या नाकावर टिच्चून रात्री एकाच वेळी चोरीच्या एक दोन नव्हे तर तब्बल २० घटना घडल्या आहैेत. त्यातील ११ घटना एकट्या वडगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तर नऊ यवतमाळ शहर
दारव्हा रोड : माजी आमदाराच्या फ्लॅटचा समावेश
यवतमाळ : दारव्हा रोडवर पोलिसांच्या नाकावर टिच्चून रात्री एकाच वेळी चोरीच्या एक दोन नव्हे तर तब्बल २० घटना घडल्या आहैेत. त्यातील ११ घटना एकट्या वडगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तर नऊ यवतमाळ शहर ठाण्याच्या हद्दीतील आहेत. चोरीच्या या मालिकेने पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेची लक्तरे वेषीवर टांगली गेली आहे. तसेच नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दारव्हा मार्गावर सोमवारी रात्री २ वाजतापासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला. जसराणा अपार्टमेंटमधील संजय रामटेके , मनोज जयस्वाल, झोपाट, डॉ. संतोष जिभकाटे यांच्या फ्लॅटला निशाणा बनविण्यात आले. त्यात केवळ रामटेके यांच्याकडील १० हजारांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने असा २५ हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांच्या हाती लागला. उर्वरीत फ्लॅटमध्ये विद्यार्थी रहात असल्याने आणि काही रिकामे असल्याने चोरट्याची निराशा झाली. जसराणा अपार्टमेंटच्या ए-टू या इमारतीमधील डॉ. सुधांशिव, मनोज जयस्वाल आणि शहा यांच्या फ्लॅटमध्ये चोरटे शिरले. मात्र तेथेही चोरट्यांच्या हाती फारसे काही लागले नाही. त्यानंतर चोरट्यांनी तेथीलच रॉयल हेरीटेज अपार्टमेंटकडे मोर्चा वळविला. तेथे माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, बँक व्यवस्थापक अजमिरे यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडले. सुदैवाने दोन्ही फ्लॅट रिकामे होते. त्यानंतर रॉयल पॅलेस अपार्टमेंटमध्ये चोरटे शिरले. हिवरीचे वनपाल व्ही. जी. तोडसाम, पहाडेकर, कोसारे आणि रंगारी यांच्या फ्लॅटच्या दाराच्या कड्या तोडल्या. या अपार्टमेंटच्या मागील सीडाम यांच्या घरातून तीन हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. त्यानंतर चोरट्यांनी दारव्हा नाक्यावरील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या अमोल जांभळे, चेतन पांडे, रमेश शहाकार, प्रभाकर जाधव, बालू रामेकर आणि पिंटू मोकाशे यांच्या सहा पान टपऱ्या फोडल्या. तत्पूर्वी चोरट्यांनी महावीर नगर भाग एक आणि दोन मध्ये दोन घरफोड्या केल्या. महिनाभरापूर्वी जसराणा अपार्टमेंटमध्ये चोरट्यांनी एकाच रात्री सहा फ्लॅटमध्ये चोरी केली होती. त्यानंतर सोमवारी रात्री पुन्हा मोहिम राबवून २० ठिकाणी चोऱ्या केल्या. त्यापैकी केवळ सहा घटनांची फिर्याद देण्यात आली. (स्थानिक प्रतिनिधी)