मुदत संपल्यानंतरही २० हजार शेतकरी प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 11:47 PM2018-05-15T23:47:16+5:302018-05-15T23:47:16+5:30
नाफेडने मुदत संपल्याने मंगळवारपासून जिल्ह्यातील तूर खरेदी बंद केली आहे. परिणामी नोंदणीकृत २० हजार शेतकऱ्यांपुढे आपली तूर आता कुठे विकावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तूर खरेदीला मुदतवाढ द्यावी, या मागणीसाठी जिल्हा प्रशासनाने राज्याकडे प्रस्ताव पाठविला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नाफेडने मुदत संपल्याने मंगळवारपासून जिल्ह्यातील तूर खरेदी बंद केली आहे. परिणामी नोंदणीकृत २० हजार शेतकऱ्यांपुढे आपली तूर आता कुठे विकावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तूर खरेदीला मुदतवाढ द्यावी, या मागणीसाठी जिल्हा प्रशासनाने राज्याकडे प्रस्ताव पाठविला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाली नाही तर शेतकऱ्यांना खुल्या बाजारात आपली तूर कवडीमोल भावात विकावी लागेल.
खुल्या बाजारात तुरीचे दर गत काही वर्षांपासून कोसळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत होते. हा प्रकार टाळण्यासाठी शासनाने नाफेडच्या माध्यमातून तूर खरेदीचा निर्णय घेतला. फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यात १४ केंद्रावर खरेदी सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आॅनलाईन नोंदणी करण्याचे आदेश पणन विभागाने दिले होते. १८ एप्रिलपर्यंत शेतकºयांना आपल्या तुरीची आॅनलाईन नोंदणी करावयाची होती. जिल्ह्यातील तब्बल ३५ हजार शेतकऱ्यांनी तुरीची आॅनलाईन नोंदणी केली. दरम्यानच्या काळात विविध कारणांमुळे नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर गोंधळ झाला. बारदाणा नाही, गोदाम उपलब्ध नाही, आदी कारणांमुळे ही खरेदी मंदावली. परिणामी मंगळवार १५ मे रोजी मुदत संपल्यानंतरही जिल्ह्यातील २० हजार शेतकरी तूर विक्रीच्या प्रतीक्षेतच राहिले.
खुल्या बाजारात तुरीचे दर घसरले आहे. यामुळे शेतकऱ्यांचा ओढा नाफेडच्या केंद्राकडे होता. शासनाचा हमी दर ५४५० आहे. तर खुल्या बाजारात तुरीचा दर ४१०० रुपये आहे. १३५० रुपयांची तफावत असल्याने नाफेडच्या तूर केंद्रावर प्रचंड गर्दी झाली होती. ३५ हजार शेतकºयांपैकी १५ हजार शेतकऱ्यांना आपली तूर विकता आली. आता २० हजार शेतकऱ्यांकडे सुमारे एक लाख क्ंिवटल तूर आहे. ही तूर कुठे विकावी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. शासकीय तूर खरेदी बंद झाल्याने या केंद्राला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. दरम्यान जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी तूर खरेदीला मुदतवाढ द्यावी, असा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे. तूर खरेदीला मुदतवाढ मिळाल्यास शेतकऱ्यांचा प्रश्न सुटू शकतो. परंतु मुदतवाढ मिळाली नाही तर कवडीमोल भावात तूर विकण्याशिवाय पर्याय नाही.
३० कोटींचे चुकारे अडले
शेतकºयांनी नाफेडला विकलेल्या तुरीचे आतापर्यंत ७० कोटी रुपयांचे चुकारे दिले आहे. त्यानंतरही तब्बल ३० कोटी रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांना मिळालेच नाही. तूर खरेदी झालेले चुकारे मिळाले नाही म्हणून आणि तूर खरेदी झाली नाही म्हणून नोंदणीकृत असे शेतकरी अडचणीत सापडले आहे. आता राज्य शासन काय निर्णय घेते यावर भविष्य अवलंबून आहे.