यवतमाळ वनवृत्तात अवैध वृक्ष कटाई जोरात; साडेतीन वर्षांत कापली २० हजार झाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2021 01:58 PM2021-11-10T13:58:13+5:302021-11-10T14:02:49+5:30
यवतमाळ वनवृत्तातील पुसद वनविभाग वृक्षतोडीमध्ये टॉपवर आहे. या विभागात अवघ्या सहा महिन्यांत सागाची ९६६ झाडे अवैधरीत्या कापण्यात आली. त्या खालोखाल यवतमाळ (५१६), तर पांढरकवडा वनविभाग तिसऱ्या (३८०) स्थानावर आहे.
विलास गावंडे
यवतमाळ :वनविभागाने जिल्ह्यातील जंगल जणू तस्करांच्या हवाली करून दिले आहे. दरवर्षी अवैध वृक्षतोड प्रचंड प्रमाणात होत असताना या विभागाची यंत्रणा सुस्त आहे. गेली साडेतीन वर्षांत यवतमाळ वनवृत्तात सागवानाची १९ हजार ४६३ झाडे अवैधरीत्या कापण्यात आली. यातून एक कोटी ३४ लाख रुपयांहून अधिक रकमेचा दणका या विभागाला बसला.
बेवारस असलेले वननाके, वनअधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मुख्यालयाला दांडी, जंगलात होत असलेले वाढते अतिक्रमण याचा हा परिणाम मानला जात आहे. सागवानाशिवाय इतर प्रकारची वृक्षही बेसुमार कापली जात आहेत. यावर नियंत्रण आणण्यात वनविभागाची मंडळी पूर्णपणे अपयशी ठरली आहे.
वनरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्यासाठी लाखो रुपये खर्च करून निवासस्थाने उभारली आहेत. याचा वापर हे कर्मचारी अपवादानेच करतात. या बंगल्यांना मोठमोठ्या झुडुपांनी वेढले आहे. दारे, खिडक्या भुरटे चोर काढून नेत आहेत. कर्मचाऱ्यांचे वनाकडे होत असलेले दुर्लक्षच सागवान चोरट्यांसाठी चांगली संधी उपलब्ध करून देत आहे.
यवतमाळ वनवृत्ताचे हे अपयश माहितीच्या अधिकारात पुढे आले आहे. नागपूर येथील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी मिळविलेली माहिती त्यांनी 'लोकमत'ला उपलब्ध करून दिली आहे. सन २०१८ मध्ये यवतमाळ वनवृत्तात सागवानाची ६१५७ झाडे कापल्याने ४२ लाख पाच हजार रुपयांचा दणका वनविभागाला बसला. हाच प्रकार दुसऱ्या वर्षीही कायम राहिला. २०१९ मध्ये सागवानाच्या ४५३२ झाडांवर कुऱ्हाड चालविण्यात आली. ३२ लाख २७ हजार रुपयांची संपत्ती तस्करांच्या घशात गेली.
सन २०२० मध्ये वृक्षतोडीची गती खूपच वाढली. या वर्षात परवाना मिळाल्यागत झाडे तोडण्यात आली. ६१५७ सागवान वृक्ष या वर्षात कापून ४२ लाख पाच हजार रुपयांचा दणका या खात्याला दिला. सागवानाशिवाय इतर प्रकारची लाखो रुपयांची वृक्षही कापण्यात आली. वनविभागाची यंत्रणा तस्करांचा हा प्रताप पाहण्यापलीकडे काहीच करू शकली नाही.
चालू वर्षात तोडली अडीच हजार वृक्ष
सन २०२१ मधील सहा महिने वनतस्करांसाठी वनविभागाच्या कृपेने चांगलेच लाभदायी ठरले. २२२९ सागवान झाडे कापण्याची संधी तस्करांनी साधली. १४ लाख ४९ हजार रुपयांचा चुना या काळात वनविभागाला लावण्यात आला. अजूनही जंगल सपाट करण्याची तस्करांची मोहीम थांबलेली नाही. वनविभागाला याचे काहीही सोयरसुतक नाही. बेसुमार होत असलेली वृक्षतोड थांबविण्यासाठी वृक्षप्रेमी पुढे येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पुसद वनविभाग टॉपवर
यवतमाळ वनवृत्तातील पुसद वनविभाग वृक्षतोडीमध्ये टॉपवर आहे. या विभागात अवघ्या सहा महिन्यांत सागाची ९६६ झाडे अवैधरीत्या कापण्यात आली. त्या खालोखाल यवतमाळ (५१६), तर पांढरकवडा वनविभाग तिसऱ्या (३८०) स्थानावर आहे. लाखो रुपयांची वृक्षतोड या विभागात झालेली आहे. वृक्षतोडीचे प्रमाण असेच राहिल्यास मोठमोठी जंगलं नष्ट झाल्यास नवल वाटू नये.