२००० नवीन बसेससाठी शासनाला साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 12:58 PM2020-02-13T12:58:32+5:302020-02-13T13:00:16+5:30

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात दोन हजार नवीन लालपरी आणण्यासाठी शासनाला साकडे घालण्यात आले आहे.

2000 new buses required in state | २००० नवीन बसेससाठी शासनाला साकडे

२००० नवीन बसेससाठी शासनाला साकडे

Next
ठळक मुद्देमहामंडळ संचालकांच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर६०० कोटी हवे

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात दोन हजार नवीन लालपरी आणण्यासाठी शासनाला साकडे घालण्यात आले आहे. यासाठी ६०० कोटी रुपयाची मागणी करण्यात आली आहे. महामंडळाचे अध्यक्ष तथा परिवहनमंत्री अ‍ॅड.अनिल परब यांच्या अध्यक्षतेत झालेल्या एसटी महामंडळ संचालक मंडळाच्या बैठकीत तसा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
गतवर्षी शासनाने ७०० साध्या बसेस (५०० लालपरी, २०० विठाई) खरेदी करण्यासाठी महामंडळाला निधी देण्याचे मान्य केले होते. त्यानुसार महामंडळाने १८६ कोटी रुपयांची मागणी शासनाकडे केली होती. यातील ११० कोटी रुपये शासनाने महामंडळाला दिले आहेत. या ७०० बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत.
एसटीच्या सेवेचा दर्जा आणखी उंचावण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये शासनाने दोन हजार साध्या बसेस खरेदी करण्यासाठी ६०० कोटींची तरतूद करावी, असा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे, अशी माहिती ना.अ‍ॅड.अनिल परब यांनी दिली असल्याचे महामंडळाच्या जनसंपर्क विभागातर्फे कळविण्यात आले आहे.
गाव ते तालुका, गाव ते जिल्हा अशा सुमारे ६० किलोमीटरच्या परिघामध्ये एसटीने प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे. एसटीच्या एकूण प्रवासी संख्येपैकी तब्बल ९० टक्के प्रवासी या परिघामध्येच प्रवास करतात. या प्रवासी वर्गाला एसटीची लालपरीच अविरत सेवा देत आहे. या सेवेचा दर्जा आणखी उंचावण्याच्या दृष्टीने नवीन बसेस खरेदीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे, असल्याचे जनसंपर्क विभागाने म्हटले आहे.

Web Title: 2000 new buses required in state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.