बाबाजी दाते महिला बॅंक घोटाळ्यातील २०६ आरोपींना तूर्तास अटक नाही

By सुरेंद्र राऊत | Published: September 8, 2024 07:05 PM2024-09-08T19:05:27+5:302024-09-08T19:05:55+5:30

१४२ कर्जदारांचे व्यवहार थांबले : ओटीएससाठी न्यायालयाची हवी पूर्व परवानगी

206 accused in Babaji Date Mahila Bank scam are not arrested at present | बाबाजी दाते महिला बॅंक घोटाळ्यातील २०६ आरोपींना तूर्तास अटक नाही

बाबाजी दाते महिला बॅंक घोटाळ्यातील २०६ आरोपींना तूर्तास अटक नाही

यवतमाळ : येथील बाबाजी दाते महिला सहकारी बॅंकेत २४२ रुपयांचा अपहार झाल्याचे विशेष लेखा परीक्षणातून पुढे आले. यामध्ये २०६ जणांवर ठपका ठेवण्यात आला. त्यांच्यावर गुन्हेही दाखल झाले. या अपहाराची चौकशी करण्यासाठी विशेष समिती गठित करण्यात आली. आता या समितीने जेमतेम कामाला सुरुवात केली आहे. अजूनही अपहाराशी संबंधित दस्तावेज ताब्यात घेतलेले नाही. त्यामुळे या घोटाळ्यात सहभागी असणाऱ्या आरोपींवर इतक्यात अटकेची कारवाई होण्याची कोणतीच शक्यता नाही. 

सहकार आयुक्त पुणे यांच्या आदेशावरून महिला बॅंकेतील घोटाळ्याची विशेष लेखा परीक्षकांनी चौकशी केली. त्यानंतर यामध्ये सहभाग असणाऱ्यांवर ठपका ठेवत तसा अहवाल तयार केला. या अहवालानुसार गुन्हे दाखल झाले. त्यानंतरही या २४२ कोटींच्या घोटाळ्यात तडकाफडकी कारवाई होताना दिसत नाही. तपास करणाऱ्या विशेष समितीने ४ सप्टेंबर रोजी बॅंक अवसायकांना पत्र देऊन गुन्हा दाखल झालेल्या कर्जदारांची ओटीएस प्रक्रिया थेट करू नये असे निर्देश दिले आहे. आरोपी कर्जदारांना कर्जाची परतफेड करायची असेल तर न्यायालयाची पूर्वपरवानगी घ्यावी, अशी अट घालण्यात आली आहे. ज्या १४२ कर्जदारांकडेन २४२ कोटी अडकले आहेत. ती रक्कम वसुलीसाठी नवा अडथळा निर्माण झाला आहे. फौजदारी कारवाईत गुंतागुंत निर्माण होऊ नये यासाठी एसआयडीकडून ही खबरदारी घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. 

अपहारात दोषी असणाऱ्यांकडून जामिनासाठी धावाधाव सुरू केली होती.  मात्र पोलिस कारवाई संथगतीने असल्याने आता त्यांनीही जामिनाचा पिच्छा सोडला आहे. बॅंक घोटाळ्यातील सर्वच आरोपी राजरोसपणे शहरात फिरत आहेत. त्यांच्यावर अपहाराचे गंभीर गुन्हे दाखल झाले आहे. मात्र सध्या तरी त्यांना पोलिसांचे कोणतेच भय नाही. 

महिनाभरात १७ कोटी ५० लाखांची वसुली

थकबाकीदारांकडून ऑगस्ट महिन्यात १७ कोटी ५० लाखांची वसुली अवसायकांनी केली आहे. मागील काही महिन्यात जवळपास ६८ कोटी रुपये थकबाकीदार कर्जदारांनी बॅंकेकडे जमा केले आहे. यातून पाच लाखांच्या आतील ठेवीदारांचे पैसे परत देण्याची प्रक्रिया सुरू आहे. २७ हजार ८८८ ठेवीदारांना सात कोटी ७० लाख रुपये परत दिले जाणार आहे. त्यासाठी ईकेवायसीची प्रक्रिया अवसायकांनी सुरू केली आहे. 

आरोपींच्या सहभागाची पडताळणी

गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचा अपहारात कितपत सहभाग आहे. याची पडताळणी केली जात आहे. हे ऑडिट झाल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल. या गुन्ह्याच्या संदर्भातील कागदपत्र जप्तीची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येत आहे. 

- चिलुमुला रजनिकांत, एसआयटी प्रमुख तथा सहायक पोलिस अधीक्षक.

Web Title: 206 accused in Babaji Date Mahila Bank scam are not arrested at present

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.