जिल्ह्यात डेंग्यूचे २१ रूग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 09:59 PM2017-11-21T21:59:05+5:302017-11-21T21:59:29+5:30
जिल्ह्यात आॅक्टोबर अखेरपर्यंत डेंग्यूचे तब्बल २१ रूग्ण आढळल्याची कबुली जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात आॅक्टोबर अखेरपर्यंत डेंग्यूचे तब्बल २१ रूग्ण आढळल्याची कबुली जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दिली.
जिल्हा परिषदेचे बांधकाम व अर्थ सभापती निमीष मानकर यांनी गेल्या स्थायी समिती सभेत जिल्ह्यात डेंग्यूचे किती रूग्ण आढळले, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर आरोग्य अधिकारी मूग गिळून बसले. त्यांनी याबाबत नेमकी माहिती नसल्याचे सांगून माहिती गोळा करण्याची ग्वाही दिली. त्यावरून महिनाभरात आरोग्य विभागाने माहिती गोळा केली. खासगी रूग्णालयांकडूनही माहिती घेण्यात आली. त्यात आॅक्टोबर अखेरपर्यंत जिल्ह्यात तब्बल २१ रूग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे मंगळवारी स्थायी समिती सभेत सांगण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे ४७ फॉगींग मशीन आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांना त्या पुरविण्यात आल्या आहेत. मात्र ४७ पैकी ३३ फॉगींग मशीन सुरू असून उर्वरित १४ मशीन बंद असल्याचेही आरोग्य विभागाने सभेत कबूल केले. सदस्यांनी मात्र सुरू असलेल्या फॉगींग मशीन नेमक्या कोणत्या गावात सुरू आहेत, अशी विचारणा केली असता प्रभारी आरोग्य अधिकारी निरूत्तर झाले. डेंग्यूचा आजार नियंत्रणात राहावा यासाठी ठोस उपाययोजनांची गरज व्यक्त करण्यात येत आहे.
१०८ रूग्णवाहिका कुचकामी
शासनाने रूग्णांना तत्काळ आरोग्य सेवा मिळावी म्हणून अद्ययावत १०८ क्रमांकाची रूग्णवाहिका उपलब्ध करून दिली. मात्र ही रूग्णवाहिका वेळेत रूग्णांपर्यंत पोहोचतच नाही. फोन केल्यानंतर तीन तासानंतर ती रूग्णापर्यंत पोहोचते, असा आरोप सदस्यांनी केला. रूग्णवाहिकेच्या सेवेपोटी बीव्हीजी कंपनीला दरवर्षी २०० ते २५० कोटी रूपये अदा केले जातात. त्यामुळे या रूग्णवाहिकेच्या कार्याची तपासणी करण्याची मागणी केली.