नेर येथे शासन निर्णयाची होळी करणाऱ्या २१ जणांवर गुन्हा
By admin | Published: July 3, 2017 02:06 AM2017-07-03T02:06:59+5:302017-07-03T02:06:59+5:30
कर्जमाफी संदर्भातील शासन निर्णयाची होळी करून निषेध नोंदविणाऱ्या २१ आंदोलकांवर नेर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : कर्जमाफी संदर्भातील शासन निर्णयाची होळी करून निषेध नोंदविणाऱ्या २१ आंदोलकांवर नेर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. शेतकरी युवा संघर्ष समितीने शनिवारी तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले होते. दरम्यान, शेतकऱ्यांचे आंदोलन दडपले जात असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य निखिल जैत पाटील यांनी केला आहे.
शासन निर्णय शेतकरी हिताचा नसल्याचे सांगत शेतकरी युवा संघर्ष समितीने जीआरच्या प्रती जाळल्या. शनिवारी पोलिसांनी याप्रकरणी संघर्ष समितीचे गोपाल चव्हाण, संतोष अरसोड, सतीश चवात, जिल्हा परिषद सदस्य निखिल जैत, मुकुंद गावंडे, सदानंद पेचे, नितीन खैरे यांच्यासह २१ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी जमवू नये या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन, पूर्वसूचनेशिवाय आंदोलन आदी आरोप करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासनातर्फे गणेश इसळ यांनी केलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. गुन्हा दाखल झाल्याने आंदोलन तीव्र होईल, फसव्या कर्जमाफीचा निषेध होणारच, असे समितीचे गोपाल चव्हाण यांनी सांगितले. शासन सर्व बाजूने शेतकऱ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे. झालेली कर्जमाफी अन्यायकारक आहे. विरोध केल्यास गुन्हा नोंदविण्याची कारवाई करायची, या बाबीचा निषेध करत असल्याचे जिल्हा परिषद सदस्य निखिल पाटील जैत यांनी म्हटले आहे.