चोरट्यांची २१ दुचाकी चोरल्याची कबुली
By admin | Published: August 26, 2016 02:32 AM2016-08-26T02:32:12+5:302016-08-26T02:32:12+5:30
शहरासह तालुक्यात गत तीन महिन्यांपासून दुचाकी चोरीच्या घटनांत वाढ झाली होती.
एलसीबीचे डिटेक्शन: दोघे चोरटे मराठवाड्यातील, सहा दुचाकी जप्त
पुसद : शहरासह तालुक्यात गत तीन महिन्यांपासून दुचाकी चोरीच्या घटनांत वाढ झाली होती. मात्र चोरटे हाती लागत नव्हे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते. अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. दोन चोरट्यांना जेरबंद केले असून त्यांनी २१ दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून सहा दुचाकी जप्त केल्या असून गुरुवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
करण उर्फ सम्राट गणेश जाधव (२४) रा. अमृतनगर, अर्धापूर, जि. नांदेड आणि आनंद रामजी कदम (२५) रा. पांगरी, जि. नांदेड अशी चोरट्यांची नावे आहेत. या दोघांना पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. त्यांचा पीसीआर घेतला असता त्यानी विविध ठिकाणी चोरलेल्या दुचाकींची माहिती दिली. नांदेड आणि बीड जिल्ह्यातून सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, अतिरिक्त पोलीस अधीक्षक काकासाहेब डोळे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख संजय देशमुख, पुसद शहरचे ठाणेदार गजानन शेळके यांनी पथक गठण केले. या पथकात वसंत चव्हाण, सैयद, विजय चव्हाण, माधव आत्राम, बॉबी इंगळे यांचा समावेश होता. त्यांनी या चोरट्यांचा छडा लावला. इतर दुचाकींचा शोध पोलीस घेत आहे. (तालुका प्रतिनिधी)
अशी होती चोरीची पद्धत
पोलिसांच्या ताब्यात असलेल्या चोरट्यांनी चोरीची पद्धत सांगितली तेव्हा पोलीसही थक्क झाले. हॅन्डल लॉक न केलेल्या दुचाकी हे चोरटे चोरत होते. चोरून नेताना पेट्रोलपंपावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजरेत येऊ नये म्हणून पेट्रोलची बॉटल जवळ ठेवत होते. त्यानंतर मास्टर चावीचा वापर करीत असल्याचे त्यांनी सांगितले.