जमिनीचे २२ हजार फेरफार रखडले

By admin | Published: April 13, 2016 02:41 AM2016-04-13T02:41:41+5:302016-04-13T02:41:41+5:30

रियल इस्टेट व्यवसायात खरेदी-विक्रीसाठी फेरफार हा महत्त्वपूर्ण दस्तावेज असला तरी जिल्ह्यात तब्बल २२ हजार फेरफार रखडले आहेत.

22,000 of the land remained closed | जमिनीचे २२ हजार फेरफार रखडले

जमिनीचे २२ हजार फेरफार रखडले

Next

खरेदी-विक्री प्रभावित : कनेक्टीव्हिटीची समस्या
यवतमाळ : रियल इस्टेट व्यवसायात खरेदी-विक्रीसाठी फेरफार हा महत्त्वपूर्ण दस्तावेज असला तरी जिल्ह्यात तब्बल २२ हजार फेरफार रखडले आहेत. त्यामुळे मालमत्तेचे व्यवहार प्रलंबित पडले आहे. फेरफार रखडल्याने महसूल यंत्रणेविरुद्ध नागरिकांमध्ये रोष पाहायला मिळतो आहे.
पूर्वी महसुलातील बहुतांश कागदपत्रे ही हस्तलिखित दिली जायची. स्थावर मालमत्तेत महत्वाचा कागद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फेरफारचाही त्यात समावेश होता. परंतु जमाबंदी आयुक्तांनी (पुणे) १४ जानेवारी २०१६ पासून हस्तलिखित फेरफार देण्यास मनाई केली आहे. आता आॅनलाईन पद्धतीने हे फेरफार दिले जात आहे. परंतु हे फेरफार आता अत्याधुनिक तंत्रज्ञानासोबत जुळले गेल्याने तलाठी, मंडल अधिकाऱ्यांची कोंडी झाली आहे. कारण या यंत्रणेचा तंत्रज्ञानासोबत तेवढा निकटचा संबंध नाही.
त्यामुळे या आॅनलाईन व संगणकीय कामासाठी त्यांना खासगी कॉम्प्युटर आॅपरेटरची मदत घ्यावी लागत आहे. शासनाच्या सूचनेवरून त्यांनी लॅपटॉप, डोंगल, डीजिटल सिग्नेचर खरेदी केले असले तरी आॅपरेटरच्या अनुपस्थितीत ही उपकरणे पडून राहतात.
आॅनलाईन पद्धतीमुळे गेल्या दोन-अडीच महिन्यात जिल्ह्यात सुमारे ६० हजार फेरफार रखडले होते. त्यातील ३८ हजार फेरफार आतापर्यंत पूर्ण करण्यात आले आहे. आणखीही २२ हजार फेरफार मिळण्याची शेतकरी-मालमत्ताधारकांना प्रतीक्षा आहे. प्रलंबित फेरफारमध्ये सर्वाधिक यवतमाळ शहर आणि लगतच्या ग्रामपंचायत क्षेत्रातील आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून शहरातील प्लॉट, फ्लॅट खरेदी-विक्रीचे व्यवहार प्रभावित झाले आहेत.
आॅनलाईन फेरफार न मिळण्यामागे कनेक्टीव्हीटी, स्पीड, किचकट प्रक्रिया ही कारणे पुढे केली जात आहे. जुनेच २२ हजार फेरफार प्रलंबित असतील तर नवे केव्हा मिळणार असा सूर तहसील कार्यालयात फेरफारसाठी येणाऱ्या नागरिकांमधून ऐकायला मिळतो आहे. फेरफार प्रलंबित राहण्याची ही समस्या वणीपासून उमरखेडपर्यंत सारखीच असल्याचे सांगितले जाते. फेरफार व पर्यायाने व्यवहार थांबल्याने नागरिकांना आपल्याकडील कार्यप्रसंग लांबणीवर टाकावे लागले आहे. नागरिक फेरफारसाठी तलाठ्यांकडे येरझारा मारून त्रस्त आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: 22,000 of the land remained closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.