१६ वर्षांत २२९ शेतकरी आत्महत्या
By Admin | Published: March 17, 2017 02:50 AM2017-03-17T02:50:41+5:302017-03-17T02:50:41+5:30
महाराष्ट्रातील पहिली शेतकरी आत्महत्या झालेल्या महागाव तालुक्यात गत १६ वर्षांत २२९ शेतकऱ्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला.
महागाव तालुक्यात नापिकी : साहेबराव पाटलांच्या आत्महत्येची धग
महागाव : महाराष्ट्रातील पहिली शेतकरी आत्महत्या झालेल्या महागाव तालुक्यात गत १६ वर्षांत २२९ शेतकऱ्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. चिलगव्हाण येथील साहेबराव पाटलांच्या आत्महत्येनंतरही अद्यापपर्यंत आत्महत्तेचे सत्र थांबले नाही. आता १९ मार्च रोजी शेतकऱ्यांसाठी अन्नत्याग आंदोलन केले जात आहे.
महागाव हा आदिवासीबहुल तालुका असून या तालुक्यात शेतकऱ्यांची संख्या ३० हजार आहे. बहुतांश कुटुंब केवळ शेतीवरच उपजीविका करतात. परंतु गत काही वर्षांपासून नापिकीमुळे शेतकऱ्यांची आर्थिकस्थिती खालावली. परिणामी अनेक शेतकऱ्यांनी गळफास लावून जीवनयात्रा संपवली. महागाव तालुक्यात एका पाठोपाठ एक २२९ शेतकऱ्यांनी १६ वर्षात मृत्यूला कवटाळले आहे.
महागाव तालुक्यातील बहुतांश शेतकरी अल्पभूधारक आणि कोरडवाहू आहे. शासकीय योजनांची माहिती मिळत नाही. सिंचनासाठी वेणी प्रकल्प असला तरी अद्यापपर्यंत त्याचे पाणी टेलपर्यंत पोहोचले नाही. अशा परिस्थितीत महागाव तालुक्यावर निसर्गाची अवकृपा असते. त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत जातात. त्यातूनच आत्महत्या होत आहे. शासकीयस्तरावर केवळ पॅकेजेस दिले जात असले तरी ठोस उपाययोजना मात्र होत नाही. आता १९ मार्च रोजी होणाऱ्या अन्नत्याग आंदोलनाने महागाव तालुका पुन्हा चर्चेत आला असून शेतकऱ्यांसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी आहे.
महागावसारखीच अवस्था जिल्ह्यातील इतरही तालुक्यांची आहे. दररोज आजही कुठे ना कुठे आत्महत्या होत असल्याने आकडे फुगत चालले आहेत. (शहर प्रतिनिधी)