वाचनासाठी शाळांनी उभारले २३ लाख
By admin | Published: October 16, 2015 02:25 AM2015-10-16T02:25:35+5:302015-10-16T02:25:35+5:30
भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी गुरूवारी वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.
यवतमाळ : भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी गुरूवारी वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील शिक्षकांनी गेल्या वर्षभरापासून विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या ‘पुस्तक भिसी’मध्ये तब्बल २३ लाख रुपयांचे योगदान दिले आहे. शिक्षणाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या आगळ्या प्रकल्पातून ग्रामीण विद्यार्थ्यांना आपसूकच वाचन प्रेरणा मिळत आहे.
खेड्यातील मुलांपर्यंत अजूनही हवे तसे इंटरनेट पोहोचलेले नाही. अशावेळी पुस्तक हेच त्यांच्यासाठी माहितीचा खजिना ठरू शकते. परंतु, तेथे सार्वजनिक वाचनालयांची वानवा आहे. शाळांतील भांडारही मर्यादित असते. ही परिस्थिती लक्षात घेता शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांनी जिल्हा परिषद शाळांमध्ये वर्षभरापूर्वी ‘पुस्तक भिसी’ हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमासाठी प्रत्येक शाळेतर्फे दरमहा शंभर रुपये, तर केंद्रप्रमुखांकडून शंभर रुपयांचे योगदान दिले जाते. या माध्यमातून गेल्या १० महिन्यांमध्ये जिल्ह्यातील शाळांनी पुस्तकांसाठी २३ लाख ३६ हजार रुपयांचे योगदान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पात जिल्ह्यातील सर्व केंद्रांनी आवर्जून सहभाग नोंदविला. प्रत्येक केंद्र संमेलनात ड्रॉ काढून केंद्राअंतर्गतच्या शाळांना पुस्तके वाटप केली जातात. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार पुस्तके पोहोचण्यास मदत झाली आहे. शिवाय, शिक्षकांनाही अध्यापनासाठी त्या पुस्तकांचा उपयोग होत आहे.
जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा उद्देश होता. त्यांना वाचनाची गोडी लागावी म्हणून पुस्तक भिसी सुरू केली. आता डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमत्त साजऱ्या होणाऱ्या वाचन प्रेरणा दिनी या प्रकल्पाचा अधिक चांगला उपयोग होणार आहे, अशी प्रतिक्रिया प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. (स्थानिक प्रतिनिधी)