धाडीत २४ लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 10:20 PM2019-03-05T22:20:03+5:302019-03-05T22:20:34+5:30

सोशल क्लबच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सोमवारी सायंकाळी धाड टाकून पांढरकवडा पोलिसांनी आठ कारसह २४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या जुगार अड्ड्याचा म्होरक्या व त्याचे साथीदार मात्र पळून जाण्यास यशस्वी झाले.

24 lakhs of money seized | धाडीत २४ लाखांचा मुद्देमाल जप्त

धाडीत २४ लाखांचा मुद्देमाल जप्त

Next
ठळक मुद्देआठ कार ताब्यात : पिंपळखुटीतील जुगार अड्डा उद्ध्वस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : सोशल क्लबच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सोमवारी सायंकाळी धाड टाकून पांढरकवडा पोलिसांनी आठ कारसह २४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या जुगार अड्ड्याचा म्होरक्या व त्याचे साथीदार मात्र पळून जाण्यास यशस्वी झाले.
दरम्यान, राजू माधुसूदन सहानी रा.निझामाबाद (तेलंगणा) हा पोलिसांच्या हाती लागला आहे. आरोपी राजूने पळून गेलेल्या अड्डाचालक व त्याच्या साथीदाराची नावे पोलिसांना चौकशीदरम्यान सांगितली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
पांढरकवडा शहरातील आठवडी बाजार परिसरात सुरू असलेला जुगार अड्डा, मटका व चेंगळ अड्ड्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तातडीने गुन्हेगारांचे कर्दनकाळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनिलसिंग गौतम यांची ठाणेदारपदी नियुक्ती केली होती. गौतम रूजू होताच त्यांनी आपल्या कार्यप्रणालीनुसार शहरासह संपूर्ण तालुक्यातील अवैध धंदे बंद केले.
अवैध व्यावसायिक आपले अवैध धंदे सोडून भूमिगत झाले होते. अवैध धंदेचालकांनी गुप्त बैठका घेऊन ठाणेदारांना हटविण्याचे षडयंत्र रचले. काही राजकीय लोकांना हाताशी पकडून त्यांनी सर्व प्रकारे प्रयत्न केला आणि या प्रयत्नांना काही राजकीय नेत्यांनी समर्थन दिले. परिणामी केवळ ३८ दिवसांत ठाणेदार गौतम यांची येथून बदली झाली. बदली होताच, पुन्हा अवैध व्यवसायाला उत आला. तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या पिंपळखुटी येथील आंतरराज्यीय जुगार अड्डा खुलेआम सुरू होता.हा अड्डा केव्हाही बंद नव्हता. त्याला राजकीय पाठबळही होते. मात्र ठाणेदार गौतम यांनी हा अड्डा बंद केला होता. मात्र आता त्यांची बदली होताच, हा अड्डा पुन्हा सुरू झाला. शनिवारी या अड्ड्याची साफसफाई करण्यात आली आणि तीन टेबल लावून सर्व सोयींनीयुक्त असलेला अड्डा सुरू करण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान, ही बाब पिंपळखुटी येथील नागरिकांना कळताच, त्यांनी अड्डयावर जाऊन संबंधिताना धारेवर धरले व पांढरकवडा पोलिसांना दूरध्वनीवरून या अड्डयाबाबत माहिती दिली. त्यानंतर सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद झळके व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाड टाकली. पोलिसांचे पथक दिसताच, अड्ड्यावरील सर्वजण पळून जाण्यात यशस्वी झाले. परंतु राजू सहानी नामक इसम पोलिसांच्या हाती लागला. त्याने या अड्ड्याबाबत पोलिसांना माहिती दिली. नेर येथील अभिद्र कणसे, मुन्ना कश्यप रा.राजूर फाटा हा अड्डा चालवित असल्याची माहिती दिली. जुगार अड्ड्यासमोर उभी केलेली आठ वाहने ताब्यात घेण्यात आली.

जुगार अड्ड्याला पांढरकवडा पोलिसांचे अभय
ठाणेदार गौतम यांची बदली झाल्यानंतर पांढरकवडातील नागरिक पोलीस ठाण्यावर धडकले होते. त्यावेळी कोणतेही अवैध धंदे सुरू होऊ देणार नाही, असे आश्वासन पांढरकवडा पोलीस दलाकडून मिळाले होते. मात्र एक आठवडाही लोटत नाही तोच, पिंपळखुटीतील हा जुगार अड्डा सुरू झाला कसा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याला पांढरकवडा पोलिसांनीच तर अभय दिले नव्हते नाही, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.

Web Title: 24 lakhs of money seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस