स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा यांचा २४ वा स्मृती समारोह उद्यापासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2021 09:18 PM2021-11-23T21:18:25+5:302021-11-23T21:22:40+5:30
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृती समारोहास बुधवार, दि. २४ नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृती समारोहास बुधवार, दि. २४ नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे. बुधवारी सायंकाळी ६.३० वाजता प्रसिद्ध गायिका हरगुण कौर (पंजाब) व प्रसिद्ध गायक प्रथमेश लघाटे (महाराष्ट्र) यांच्या स्वरांची मैफल स्वरांजली बाबूजींचे समाधी स्थळ असलेल्या प्रेरणास्थळावर रंगणार आहे.
हरगुण कौर मूळच्या अमृतसर (पंजाब) येथील आहेत. यावर्षीच्या सातव्या सूरज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्काराच्या त्या मानकरी असून, ‘इंडियाज गाॅट टॅलेंट’मधील त्या विजेत्या आहेत. तसेच ‘व्हाॅइस २०१९’ च्याही त्या विजेत्या आहेत. ‘जय हो’ हे गाणे प्रभावीपणे सादर केल्याबद्दल खुद्द संगीतकार ए. आर. रहमान यांनी हरगुण कौर यांचा सन्मान केला होता. ‘व्हाॅइस ऑफ पंजाब’ या स्पर्धेतही त्यांनी अंतिम फेरी गाठली. त्यावेळी ख्यातनाम गायिका आशा भोसले यांनी कौर यांना उज्ज्वल भविष्यासाठी आशीर्वाद दिले. वयाच्या केवळ नवव्या वर्षी हरगुण कौर यांनी राष्ट्रीय स्तरावरील हार्मोनियम पुरस्कार मिळविला. ‘ट्रीपल सीट’ या मराठी चित्रपटासाठीही कौर यांनी पार्श्वगायन केले. मराठी गायनासाठी त्यांना बेस्ट प्लेबॅक सिंगर पुरस्कार मिळाला. हिंदी, मराठीसह हरगुण कौर यांनी पंजाबी, इंग्रजी, गुजराती आणि तेलुगू भाषेतही अनेक गाणी गायली आहेत. त्या गीतकारसुद्धा आहेत. कलेच्या क्षेत्रासह शिक्षणातही गुणवंत विद्यार्थिनी म्हणून हरगुण यांची ओळख आहे. वयाच्या १७व्या वर्षी गुणवत्तेच्या जोरावर हरगुण पदवीधर झाल्या. सध्या त्या मुंबई विद्यापीठात संगीत हा विषय घेऊन संशोधन करीत आहेत.
प्रथमेश लघाटे हे महाराष्ट्राच्याच मातीतील गायन क्षेत्रातील रत्न आहे. लघाटे हेही यंदाच्या सूरज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्काराचे मानकरी आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील आरवली हे त्यांचे मूळ गाव आहे. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासून प्रथमेशनी गायन आणि तबला वादन सुरू केले. काकामुळे त्याचा गायन वादनाकडे ओढा वाढला. अगदी बालपणीच प्रथमेशनी तालुका व जिल्हापातळीवर अनेक पुरस्कार पटकाविले.
२००३ पासून त्यांनी चिपळूण येथे सतीश कुंटे आणि वीणा कुंटे यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे घ्यायला सुरुवात केली. २००८ मध्ये ‘सारेगामा लिटिल चॅम्स’मध्ये प्रथमेशची निवड झाली. तब्बल ५१ वेळा बेस्ट रँक मिळविणारे प्रथमेश या स्पर्धेतील एकमेक गायक ठरले. गायनाच्या वाटचालीत प्रथमेशने आजवर शाहू मोडक पुरस्कार, विश्वनाथ बागुल पुरस्कार, कोकण गंधर्व पुरस्कार, डाॅ. वसंतराव देशपांडे पुरस्कार, अनिल मोहिले स्मृती पुरस्कार आदी पुरस्कार पटकाविले. ‘करुणा सागर’ हा त्यांचा पहिला अल्बमही नुकताच रिलीज झाला आहे. सध्या प्रथमेशचे मर्मबंधातली ठेव आणि पंचतत्त्व हे दोन कार्यक्रम निर्माणाधीन आहेत.
बाबूजी यांचा स्मृती समारोह कार्यक्रम
n २४ नोव्हेंबर, बुधवार :
संगीत संध्या
वेळ : सायंकाळी ६.३० वाजता
स्थळ : प्रेरणास्थळ
सादरकर्ते : प्रसिद्ध गायिका हरगुण कौर (पंजाब) व प्रसिद्ध गायक प्रथमेश लघाटे (महाराष्ट्र)
n २५ नोव्हेंबर, गुरुवार :
जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलच्या इमारतीचे उद्घाटन
वेळ : सकाळी १०.४५ ते १२
स्थळ : मातोश्री दर्डा सभागृह
n २५ नोव्हेंबर, गुरुवार :
आदरांजली
वेळ : सकाळी ९ ते १०
स्थळ : प्रेरणास्थळ
सादरकर्ते : स्थानिक कलावंत
n २५ नोव्हेंबर, गुरुवार :
डाॅ. गोवर्धन लाल पाराशर यांच्या ऑस्टिओपॅथी कॅम्पचे उद्घाटन
वेळ : सकाळी १०.४५ ते १२
स्थळ : मातोश्री दर्डा सभागृह
२५, २६, २७ नोव्हेंबर :
डाॅ. गोवर्धन लाल पाराशर (जोधपूर, राजस्थान) यांचे ऑस्टिओपॅथी शिबिर
वेळ : सकाळी १० ते सायंकाळी ५. स्थळ : मातोश्री दर्डा सभागृह