२५ लाखांच्या लॉटरीचे आमिष, ६४ हजार हडपले
By admin | Published: May 5, 2017 02:08 AM2017-05-05T02:08:49+5:302017-05-05T02:08:49+5:30
राळेगाव येथील एका युवकाला २५ लाखांची लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून एका भामट्याने ६४ हजार रूपये हडपले.
यवतमाळ : राळेगाव येथील एका युवकाला २५ लाखांची लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून एका भामट्याने ६४ हजार रूपये हडपले. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध गुन्हा नोंद केला आहे.
राळेगाव येथील शांतीनगरातील मुकेश ज्ञानेश्वर जाधव (२०) या युवकाला एक भ्रमणध्वनी आला. त्याने फोन उचलला असता पलिकडील इसमाने त्याला तुम्हाला वोडाफोन कंपनीची २५ लाखांची लॉटरी लागल्याचे सांगितले. या एकाच वाक्याने मुकेश हुरळून गेला. लगेच पलिकडील इसमाने त्याला बँक अकाउन्ट क्रमांक विचारला. नंतर लॉटरीची रक्कम मिळविण्यासाठी तुम्हाला कलकत्ता येथील एका बँकेच्या अकाउन्ट क्रमांकावर ६४ हजार रूपये जमा करावे लागतील, असे सांगितले.
सतत दोन दिवस असेच भ्रमणध्वनी आल्याने मुकेशला लॉटरी लागल्याची खात्री पटली. परिणामी मुकेशने त्या इसमाने दिलेल्या कलकत्ता येथील संंबंधित बँकेच्या क्रमांकावर ६४ हजार रूपये जमा केले. मात्र अद्याप त्याला लॉटरीची रक्कम मिळालीच नाही. नंतर कुणाचा भ्रमणध्वनीही आला नाही. मात्र मुकेशचे ६४ हजार रूपये कायमचेच गेले. लॉटरीची रक्कम मिळत नसल्याने अखेर मुकेशने राळेगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात इसमाविरूद्ध भादंवि ४२०, ६६ ड नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. (शहर प्रतिनिधी)