दहा समित्यांवर २५ सदस्य निवडीचा तिढा
By admin | Published: October 30, 2014 10:58 PM2014-10-30T22:58:33+5:302014-10-30T22:58:33+5:30
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या सोबतच सभापतींची निवड करण्यात आली. या नव्या फेररचनेमुळे दहा समित्यामध्ये २५ सदस्यांची पदे रिक्त झाली आहे. या जागेवर सदस्य
यवतमाळ : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या सोबतच सभापतींची निवड करण्यात आली. या नव्या फेररचनेमुळे दहा समित्यामध्ये २५ सदस्यांची पदे रिक्त झाली आहे. या जागेवर सदस्य निवडण्यासाठी नेत्यांचा चांगलाच कस लागणार आहे. बदललेल्या राजकीय समीकरणाने तिढा निर्माण झाला आहे.
जिल्हा परिषदेत स्थायी समिती, जलव्यवस्थापन आणि स्वच्छता समिती, बांधकाम, महिला व बाल कल्याण आणि शिक्षण समितीमध्ये प्रत्येकी एक सदस्य, अरोग्य समितीमध्ये दोन, अर्थ समितीमध्ये पाच, कृषी समितीमध्ये दोन, समाजकल्याण समितीमध्ये दोन, मध्ये एक तर पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीमध्ये आठ सदस्यांची नियुक्ती करायची आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख, माजी उपाध्यक्ष ययाती नाईक, माजी सभापती प्राजक्ता मानकर, मनमोहनसिंग चव्हाण, प्रभाकर उईके, प्रवीण शिंदे यांची समितीवर निवड करायची आहे. याशिवाय पंचायत समिती सभापतींचीसुध्दा समितीवर नियुक्ती करायची आहे. सभापतींना खातेवाटप करण्यासाठी ७ नोव्हेंबरला सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. या सभेत खातेवाटप झाल्यानंतर समिती सदस्यांची निवड केली जाणार आहे. समितीवर नियुक्तीसाठी निवड करावयाची असलेल्या सदस्यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी तीन सदस्य आहेत. पंचायत समिती सभापतींमध्ये काँग्रेस सहा, राष्ट्रवादी काँग्रेस चार, शिवसेना चार आणि अपक्ष एक सभापती आहे. यातूनच विविध समिती सदस्य म्हणून निवड केली जाणार आहे.
जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. मात्र विधानसभा निवडणूकीपूर्वी घेतलेल्या या निणर्यानुसार खातेवाटप होणार काय याची उत्सुकता आहे. विधानसभेत सर्वच पक्षांनी परस्परा विरोधात दमखम आजमावला आहे. त्यामुळे कालपर्यंत अगदी शहकटशहाचे राजकारण करणारे नेते एकत्र येऊन कोणते समीकरण तयार करतात हेही महत्वाचे ठरणार आहे. जिल्हा परिषदेत सत्तेत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली. या दोन्ही काँग्रेसच्या संर्घषात जिल्हा काँग्रेसचा सफाया झाला आहे. त्यामुळे विषय समित्या निवडीला विशेष महत्व आले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)