चापडोह, बोरगावसह २५ प्रकल्प ओव्हर फ्लो
By admin | Published: July 27, 2016 12:42 AM2016-07-27T00:42:01+5:302016-07-27T00:42:01+5:30
जुलै महिन्यात कोसळलेल्या धुंवाधार पावसाने प्रकल्प ओव्हर फ्लो होत आहेत. हवामान खात्याने बुधवारपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
सतर्कतेचा इशारा : निम्न वर्धाचे नऊ दरवाजे उघडले
यवतमाळ : जुलै महिन्यात कोसळलेल्या धुंवाधार पावसाने प्रकल्प ओव्हर फ्लो होत आहेत. हवामान खात्याने बुधवारपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. यामुळे पाच तालुक्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. निम्न वर्धा प्रकल्पाचे नऊ दरवाजे उघडण्यात आले आहे. चापडोह आणि बोरगाव प्रकल्पासह २५ प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याची नोंद पाटबंधारे विभागाने केली आहे.
आठ-दहा दिवसांपासून जिल्ह्यात सतत पाऊस सुरू आहे. यामुळे जलाशयाच्या साठवण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. जुलैच्या प्रारंभी सायखेडा प्रकल्प ओव्हर फ्लो झाला होता. यानंतर १५ दिवसाच्या कालखंडात चापडोह आणि बोरगाव प्रकल्पही ओव्हर फ्लो झाला. यवतमाळ शहराला पाणी पुरवठा करणारा निळोणा प्रकल्प १२ जुलैला ओव्हर फ्लो झाला होता. यानंतर आठ दिवसाच्या अंतराने चापडोह प्रकल्प ओव्हर फ्लो झाला. यावर्षीच्या उन्हाळ्यात चापडोह प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा झाला. यामुळे चापडोह प्रकल्प उशिरा ओव्हर फ्लो झाला. शहराला पाणी पुरवठा करणारे दोनही प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने यावर्षी यवतमाळकरांना मुबलक पाणी मिळणार आहे.
मध्यम प्रकल्प म्हणून ओळखला जाणारा सायखेडा आणि बोरगाव प्रकल्प ओव्हर फ्लो झाला आहे. गोकी प्रकल्पामध्ये ९१ टक्के पाणी साठा आहे. नवरगाव मध्ये ९५ टक्के, लोअरपूसमध्ये ७७ टक्के, वाघाडी ७० टक्के, मोठा पूस ५४ टक्के, अरूणावती प्रकल्पात ४२ टक्के, अडाण प्रकल्पात ३८ टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे.
लघु प्रकल्पातील जामवाडी, कापरा, सिंगनडोह, पिंपळखुटी, रूई, ईटोळी, किन्ही, मारेगाव, दुधाना, चोरकुंड, पहूर तांडा, पहूर ई, मुरझडा, करंजी, झोटींगधर, म्हैस दोडका, नरसाळा, पोखरी, निंगणूर, सेनद, दराटी, मुडाना, तरोडा आणि पोफाळी या प्रकल्पाचा यामध्ये समावेश आहे. जिल्ह्यातील इतर ६२ लघु प्रकल्पात सरासरी ७० टक्के जलसाठ निर्माण झाला आहे. यातून मोठ्या प्रमाणात सिंचन होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सततच्या पावसाने निम्न वर्धा प्रकल्पाचे नऊ दरवाजे उघडण्यात आले आहे. या ठिकाणावरून १३२ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यात वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे या प्रकल्प पात्राच्या क्षेत्रात येणाऱ्या कळंब, बाभूळगाव, वणी, राळेगाव आणि मारेगाव तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (शहर वार्ताहर)