रस्ते-पुलांसाठी २५० कोटी
By admin | Published: March 12, 2016 02:44 AM2016-03-12T02:44:15+5:302016-03-12T02:44:15+5:30
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने यवतमाळ जिल्ह्याला रस्ते विकास निधीतून २५० कोटी रुपये मंजूर केले आहे.
केंद्रीय रस्ते निधी : आर्णी रोडला ४५ कोटी, धामणगाव रोडला ५० कोटी
यवतमाळ : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने यवतमाळ जिल्ह्याला रस्ते विकास निधीतून २५० कोटी रुपये मंजूर केले आहे. त्यात सर्वाधिक ४५ कोटी रुपये एकट्या यवतमाळ शहराला मिळाले आहे.
केंद्रीय रस्ते विकास निधीतून कोट्यवधींच्या कामाचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले होते. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने राज्यात तीन हजार कोटींच्या कामांना मंजुरी दिली आहे. त्यात केंद्राचा ६० टक्के तर राज्याचा ४० टक्के निधीतील वाटा आहे. यवतमाळ जिल्ह्याला २५० कोटी रुपयांची कामे मंजूर झाली आहे. त्यात सर्वाधिक दीडशे कोटी यवतमाळ विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांसाठी मिळाले आहे. बहुप्रतिक्षित यवतमाळ-धामणगाव रोडच्या चौपदरीकरणासाठी ५० कोटी रुपये मंजूर झाले आहे. पोस्ट आॅफीस चौक ते करळगावपर्यंत चौपदरी डांबरी रस्ता केला जाणार आहे. यवतमाळ-अकोलाबाजार मार्गासाठी ५० कोटी, यवतमाळ-मंगरुळ-रूई-अकोलाबाजार मार्गासाठी २० कोटी, पिंपळखुटी-पारवा मार्गासाठी २० कोटी तर गुंज-महागाव या दोन टप्प्यातील मार्गासाठी २० कोटी रुपये मंजूर केले गेले आहे. याशिवाय घाटंजी-पारवा सारख्या जिल्ह्यातील छोट्या मार्गांसाठी दोन ते सहा कोटी, कोळंबी-घाटंजी मार्गासाठी १४ कोटी ३३ लाख, शिंगणापूर-दाभा-बाभूळगाव-कळंब मार्गासाठी दोन कोटी, कळंब-राळेगाव-वडकी मार्गासाठी दोन कोटी, नेर-पहूर-बाभूळगाव-कळंब मार्गासाठी आठ कोटी, धावंडा नदीवरील पुलासाठी सात कोटी ५५ लाख, खुपगाव-नखेगाव-तरनोळी-लोही मार्गासाठी चार कोटी, आर्णी-सावंगा-चिरकुटा मार्गासाठी नऊ कोटी २५ लाख, पांढरकवडा तालुक्यातील सोनबर्डी-साखरा-शिबला रस्त्यासाठी १३ कोटी रुपयांची तरतूद केली गेली. जिल्ह्याच्या अन्य भागातही सीआरएफमधून रस्त्यांचे अनेक प्रस्ताव मंजूर केले गेले. केंद्राने मंजुरी दिलेल्या या रस्त्यांसाठी राज्याच्या चालू बजेटमध्ये आर्थिक तरतूद केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. (जिल्हा प्रतिनिधी)
घाट फोडून रस्ता बांधणार
धामणगाव रोडच्या चौपदरीकरणात करळगाव येथील सुमारे एक किलोमीटरच्या घाटाचा अडसर निर्माण होत आहे. मात्र या रस्त्याच्या रुंदीकरणात घाट फोडून रस्ता सरळ करण्याचा प्रस्तावही मंजूर झाल्याचे राजकीय गोटातून सांगितले जाते. परंतु बांधकाम खात्याच्या सूत्रांनी ही बाब नाकारली आहे. घाटाला लागून संरक्षित वनक्षेत्र असल्याने तेथे वृक्षतोड करण्यास आणि वन जमिनीतून रस्त्याचे बांधकाम करण्यास परवानगी मिळविण्यासाठी थेट केंद्रात प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे घाट फोडून रस्त्याचे बांधकाम तेवढे सोपे नसल्याचे बांधकाम सूत्रांनी सांगितले.
यवतमाळ मतदारसंघाला झुकते माप
जिल्ह्यात भाजपाचे पाच आमदार आहे. सर्वांनीच रस्ते विकास निधीतून मतदारसंघाचा विकास व्हावा म्हणून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना साकडे घातले होते. मात्र गडकरींची यवतमाळ मतदारसंघावर अपेक्षेप्रमाणे सर्वाधिक कृपादृष्टी झाल्याचे दिसून येते. कारण या मतदारसंघाला दीडशे कोटी मिळाले आहे. उर्वरित १०० कोटीत जिल्ह्यातील अन्य मतदारसंघांना विभागले गेले. यवतमाळला झुकते माप दिले गेल्याने सहाजिकच भाजपाचे अन्य चार आमदार, त्यांचे समर्थक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांचा हिरमोड झाल्याचे सांगितले जाते.
शहरातून जाणार चौपदरी मार्ग
नागपूर-बोरी-तुळजापूर या राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. हा संपूर्ण मार्ग चौपदरी होणार असून त्याचे कामही सुरू झाले आहे. या मार्गावरील बार, ढाबे, हॉटेल्स, पेट्रोल पंप, शो-रूम व इतर अतिक्रमण हटविले जाणार आहे. जमीन संपादनाचे काम जोरात सुरु आहे. हा महामार्ग गावाबाहेरुन जात आहे. शहरातून जाणारा मार्गही महामार्गासारखाच असावा म्हणून आर्णी रोडसाठी ४५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. बसस्थानक चौक स्थित वीज वितरण कंपनीच्या कार्यालयापासून वनवासी मारूती मंदिरापर्यंत (आर्णी रोड) रस्ता रुंदीकरण व सौंदर्यीकरण केले जाणार आहे.