स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा यांचा उद्या २५वा स्मृती समारोह; आज संगीतमय श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 11:18 AM2022-11-24T11:18:03+5:302022-11-24T11:20:08+5:30
शुक्रवारी छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत प्रार्थना सभा...
यवतमाळ: ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांचा २५ वा स्मृती समारोह शुक्रवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी आहे. यानिमित्ताने आयोजित प्रार्थना सभेला राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
बाबूजींचे समाधिस्थळ असलेल्या प्रेरणास्थळावर आज, स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी सायंकाळी ६:३० वाजता अभिजित पोहनकर यांच्या चमूची ‘बाॅलिवूड घराना’ ही संगीतमय आदरांजली अर्पण केली जाणार आहे. यात उस्ताद अभिजित पोहनकर यांचे फ्युजन, गंधार देशपांडे यांचे शास्त्रीय गायन आणि भव्या पंडित यांचे बाॅलिवूड गायन, तसेच रोहित कर्णानी, सौरभ जोशी, केयूर बर्वे, अक्षय जाधव यांची ड्रम, गिटार, तालवाद्याची सोबत राहील.
शुक्रवार, २५ नोव्हेंबरला सकाळी ९ ते ९:३० या वेळेत प्रेरणास्थळावर प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी स्थानिक कलाकार संगीतमय श्रद्धांजली अर्पण करतील. यानंतर ९:३० वाजता आयोजित कार्यक्रमाला माजी उपमुख्यमंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहतील. जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने दुपारी १२ वाजेपासून हनुमान आखाड्याच्या प्रांगणात शिवकालीन वाद्यांच्या गजरात भव्य इनामी काटा कुस्त्यांची विराट दंगल रंगणार आहे.