२६ पेट्रोलपंपांची तपासणी, केवळ दोघांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 10:18 PM2018-01-18T22:18:04+5:302018-01-18T22:18:39+5:30
वैधमापन शास्त्र विभागाने जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील २६ पेट्रोल पंपांची तपासणी केली. मात्र केवळ दोन ठिकाणी कारवाई केली. माहिती अधिकारात ही माहिती उघड झाली आहे.
के.एस. वर्मा ।
लोकमत न्यूज नेटवर्क
राळेगाव : वैधमापन शास्त्र विभागाने जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील २६ पेट्रोल पंपांची तपासणी केली. मात्र केवळ दोन ठिकाणी कारवाई केली. माहिती अधिकारात ही माहिती उघड झाली आहे.
जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवरून पेट्रोल कमी मिळत असल्याची ओरड वाहनधारकांमधून नेहमीच ऐकायला मिळते. अनेकदा त्यातून वादही होतात. परंतु प्रत्येक वेळी ही बाब सिद्ध करणे कठीण जात असल्याने पेट्रोल पंपांची कारवाईतून सुटका होते. पेट्रोल पंपाच्या तपासणीची जबाबदारी शासनाच्या वैधमापन शास्त्र विभागावर आहे. या विभागाच्या कामगिरीचा माहिती अधिकारातून आढावा घेतला असता आठ ते नऊ तालुक्यात पेट्रोल पंपांची तपासणीच झाली नसल्याची गंभीरबाब उघड झाली.
वैधमापन शास्त्र विभाग यवतमाळ येथे सहायक नियंत्रकांना ३० जुलै २०१७ ला माहिती अधिकारात माहिती मागण्यात आली होती. २७ आॅक्टोबर २०१७ ला ही माहिती देण्यात आली. त्यानुसार १ एप्रिल ते ३९ जुलै २०१७ या काळात जिल्ह्यातील एकूण २६ पेट्रोल पंपांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये पुसद दोन, दिग्रस दोन, आर्णी दोन, नेर तीन, दारव्हा सहा, बाभूळगाव एक, उमरखेड एक, वणी चार तर पांढरकवड्याच्या चार पेट्रोल पंपांचा समावेश आहे. यापैकी आर्णीतील एक व वणीतील एका पेट्रोल पंपांवर गैरप्रकार आढळून आला. त्यामुळे त्यांच्यावर वैधमापन कायदा २००५ च्या कलम ३०८ अ अन्वये कारवाई करण्यात आली. येथील एका राजकीय नेत्याने पेट्रोल पंप भाड्याने दिला होता. त्यात चीप आढळून आली. त्यामुळे या राजकीय नेत्याला ठाणे जिल्ह्यात पोलिसांसमोर पेश व्हावे लागले होते. वैधमापन शास्त्र विभागान गेल्या वर्षात यवतमाळ, कळंब, राळेगाव, मारेगाव, घाटंजी, महागाव, झरी या तालुक्यातील एकाही पेट्रोल पंपाची तापसणी केल्याची नोंद नाही.
केवळ ११ जिनिंग काट्यांची तपासणी
यवतमाळ हा बहुतांश कापूस उत्पादक जिल्हा असल्याने येथे कापसाची हजारो कोटींची उलाढाल होते. सीसीआय व पणन महासंघासोबतच सर्वाधिक खासगी खरेदी कापसाची केली जाते. बाजारात हमी भावापेक्षा जास्त भाव असल्याने पणन व सीसीआयला कापूस मिळत नाही. पर्यायाने खासगी बाजारातच सर्वाधिक उलाढाल राहते. अनेक ठिकाणी कापूस खरेदीत शेतकऱ्यांची लूट होते. जाणीवपूर्वक कमी कापूस मोजला जातो. त्यात शेतकºयाची फसवणूक होते. सर्वच भागात ही ओरड असताना वैधमापन शास्त्र विभागाने आॅक्टोबर २०१६ ते जून २०१७ या वर्षभरात जिल्ह्यात केवळ ११ ठिकाणी जिनिंगच्या वजन काट्याची तपासणी केली. त्यात कळंब एक, वणी चार, आर्णी तीन, दारव्हा दोन तर महागावच्या एका जिनिंग काट्याचा समावेश आहे. अन्य तालुक्यामध्ये एकाही जिनिंग काट्याची वर्षभरात तपासणी झाली नसल्याचे स्पष्ट होते. राळेगाव, पांढरकवडा, पुसद या भागात सर्वाधिक कापसाचे उत्पादन व खरेदी-विक्री होत असताना तेथील एकाही वजन काट्याची तपासणी न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते. त्यामुळेच येथील वैधमापन शास्त्र कार्यालयाच्या कारभाराभोवती प्रश्नचिन्ह लावले जात आहे.