डॉजबॉल स्पर्धेत २६ संघांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 12:58 AM2017-10-11T00:58:43+5:302017-10-11T00:58:57+5:30
येथील नेहरू स्टेडियमवर घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धेत २६ संघांनी सहभाग नोंदविला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील नेहरू स्टेडियमवर घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धेत २६ संघांनी सहभाग नोंदविला. १७ वर्षे मुलांच्या गटात अंजूमन उर्दू हायस्कूल, मुलींच्या गटात जायन्ट्स इंग्लिश स्कूल, १९ वर्षे गटात जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूल, तर मुलींच्या गटात स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल वणी संघाने विजेतेपद पटकाविले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ यांच्यावतीने आणि जिल्हा डॉजबॉल संघटना यवतमाळ यांच्या सहकार्याने या स्पर्धा घेण्यात आल्या. यात १९ वर्षे गटात १४, तर १७ वर्षे गटात १२ मुला-मुलींच्या संघांनी सहभाग नोंदविला.
१७ वर्षे गटात मुलांच्या अंतिम सामन्यात अंजूमन उर्दू हायस्कूल संघाने साई विद्यालय लोहारा संघाचा ३ विरूद्ध ० गुणांनी पराभव करत प्रथमच विभागस्तरावर प्रवेश निश्चित केला. मुलींच्या गटात जायन्ट्स इंग्लिश मीडियम स्कूल संघाने स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल संघाचा ७ विरूद्ध ४ गुणांनी मात देत विजय संपादन केला. १७ वर्षे वयोगटात गतविजेत्या जवाहरलाल दर्डा इंग्लिश स्कूल संघाने जायन्ट्स संघाचा ६-२ गुणांनी पराभव करत अव्वल स्थान पटकाविले. मुलींच्या गटात स्वर्णलीला वणी संघाला प्रतिस्पर्धी संघ उपस्थित नसल्याने पुढे चाल देण्यात आली.
तत्पूर्वी जयकिसान शारीरिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सतीश मानधना, राज्य क्रीडा मार्गदर्शक किशोर चौधरी, लाईक सिद्दिकी, राष्ट्रीय क्रिकेट पंच राजू टेंभरे, जिल्हा डॉजबॉल संघटनेचे अध्यक्ष प्रा. अनंत पांडे, सचिव नीलेश भगत, क्रीडा शिक्षक संजय दंडे यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. पंच म्हणून गुणवंत सोनटक्के, जितेंद्र सातपुते, एम.एन. मीर, जय मिरकुटे यांनी काम पाहिले. स्पर्धा संयोजक क्रीडाधिकारी संतोष विघ्ने होते.